no images were found
सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक – मीर तारीक अली
कोल्हापूर: सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जावू शकतो. उमेदवारांनी निवडणूक खर्चासंबंधी झालेल्या संपूर्ण खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात भरुन निवडणूक खर्च पथकाकडे दैनंदिन खर्च तपासणीच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावा, असे आदेश निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली यांनी दिले.
275 करवीर विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निरीक्षक मिर तारीक अली यांच्या अध्यक्षतेखाली रमणमळ्यातील बहुउद्देशीय हॉल येथे बैठक संपन्न झाली.
फौजदारी प्रकरणे ज्यांच्याविरुध्द प्रलंबित किंवा ज्या प्रकरणांत उमेदवारास सिध्ददोषी ठरवलेले आहे अशी प्रकरणे आहेत, अशा विधानसभेच्या निवडणूकीतील उमेदवार, अशा प्रकरणांबद्दलच्या एका घोषणापत्रास व्यापक प्रसिध्दी देतील. हे घोषणापत्र नमुना सी 1 (जोडपत्र 47) मध्ये, असा तपशील प्रकाशित करण्याच्या उद्देशासाठी मोहिमेच्या कालावधीत तीन प्रसंगी प्रसिध्द करावयाची आहेत. नमुना सी-1 उमेदवारांना पुरविण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मतदान घेण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे सेटिंग आणि सिलींग धान्य गोडावून, रमणमळा, कोल्हापूर येथे करण्यात येणार असून या कामाची तारीख उमेदवार, प्रतिनिधींना कळविण्यात येणार आहे. या ठिकाणचे कामकाज पाहण्यासाठी उमेदवार, प्रतिनिधींनी उपस्थित रहावे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण 9 व 10 नोव्हेंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे होणार आहे. मतदानादिवशी मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करण्यासाठी मतदान कक्षाची सुविधा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही प्रक्रिया उमेदवार, प्रतिनिधी पाहू शकतात.
गृह मतदानासाठी 20 पथके नेमण्यात आली असून दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे. गृह मतदानासाठी वय वर्षे 85 पेक्षा अधिक मतदारांपैकी 356 मतदारांनी व दिव्यांग मतदारांपैकी 72 असे एकूण 428 मतदारांनी गृह मतदानासाठी आवश्यक असणारा 12ड फॉर्म भरुन दिलेला आहेत. या मतदानाच्या प्रक्रियेवेळी उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. विधानसभा निवडणूकीसाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून कोणताही मतदार, मतदान प्रतिनिधी यांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेवून जाण्यास परवानगी नसेल. 275 करवीर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी शासकीय धान्य गोदाम, रमणमळा कोल्हापूर येथील D या गोडावूनमध्ये होणार आहे.
275 करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदार 1 लाख 68 हजार 193 व स्री मतदार 1 लाख 56 हजार 968 असे एकूण 3 लाख 25 हजार 161 इतके मतदार आहेत. तसेच सव्हींस व्होटर ची संख्या 681 आहे. मतदारसंघामध्ये एकूण 358 मतदान केंद्रे आहेत. 275 करवीर मतदारसंघासाठी VST, SST, VVT व FST अशी पथके करण्यात आली आहेत.
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक यांना भेटावयाचे असल्यास सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत सर्कीट हॉऊस, कोल्हापूर येथे मतदार/नागरिक भेटू अथवा मोबाईल नंबरवर संपर्क करु शकतात, अशी माहिती 275 करवीर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी दिली आहे.