no images were found
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत बसंतीचे विचित्र वागणे पाहून दिलीप आणि जुगल झाले साशंक
पुष्पा (करुणा पांडे) या धडाडीच्या आणि आशावादी स्त्रीची कहाणी सांगून सोनी सब वाहिनीवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने प्रेक्षकांचे मन काबिज केले आहे. अलीकडच्या भागांमध्ये, पुष्पा आणि हुबेहूब तिच्यासारखीच दिसणारी बसंती यांची अदलाबदली झाली आहे. पुष्पाची ओळख नष्ट करण्याच्या दुष्ट हेतूने बसंतीने पुष्पाच्या घरात शिरकाव केला आहे. तर, दुसरीकडे पुष्पाची स्मृती हरवली आहे आणि ती कानपूरला बसंतीचा टी-स्टॉल चालवते आहे.
बापोद्रा चाळीत बसंतीच्या आगमनामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. तिच्या विचित्र वागण्यामुळे दिलीप (जयेश मोरे) आणि जुगल (अंशुल त्रिवेदी) यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. बसंती पुष्पाच्या रूपात आपला जम बसवण्याचा खटाटोप करत आहे. पण तिचा बोलण्याचा अपरिचित ढंग आणि तिचे अचानक गायब होणे यामुळे चाळीतल्या रहिवासी तिच्याकडे साशंक नजरेने बघत आहेत. बसंतीने लपवलेले ‘ताना बाना’चे दस्तऐवज दिलीपला सापडल्यानंतर तणाव आणखीनच वाढतो आणि तिच्या उद्देशाविषयी शंका येऊ लागते. जुगलला तिचे वागणे खटकते आणि ही ‘खरी पुष्पा’ आहे का अशी शंका येऊ लागते.
बापोद्रा चाळीतील रहिवासी सावध झाल्यामुळे आता बसंतीचे पितळ उघडे पडणार का?
पुष्पा आणि बसंती या दोन्ही भूमिका करत असलेली करुणा पांडे म्हणते, “पुष्पा म्हणून बसंतीची वाटचाल थरारक आणि जोरदार आहे. ती आपले खरे हेतू लपवून पुष्पा असल्याचे नाटक करत आहे. आसपासच्या लोकांची आपुलकी मिळत असूनही आपला उद्देश लपवून त्यांच्याशी खोटे वागणे तिच्यासाठी आव्हानात्मक होऊ लागले आहे. पुष्पाच्या रूपात बसंती चाळीत जम बसवत असताना प्रेक्षकांपुढे आता बरीच रहस्ये उलगडणार आहेत. प्रत्येक प्रसंगात, आपले खरे रूप लोकांपुढे येईल ही भीती बसंतीच्या मनात आहे. या कथानकात खूप वळणे-आडवळणे आहेत, प्रेक्षकांची उत्कंठा वाढणारच आहे!”