no images were found
मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक नाव नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत– एस.चोक्कलिंगम
मुबंई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही त्यांनी तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले आहे.