no images were found
ऐतिहासिक शाही दसरा : देशभरातील पर्यटकांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात साजरा!
कोल्हापूर : सजवलेले उंट, मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक पोवाडे, ढोलताशा पथके अशा शाही दिमाखात अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा साजरा झाला.
देशविदेशातून आलेले पर्यटक आणि आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पालख्यांचे पुजन झाले. बंदुकीच्या फैरी झाडून गुरु महाराज, अंबाबाई आणि तुळजाभवानी या तिन्ही पालख्या भवानी मंडपातून दसरा चौकाकडे मार्गस्थ झाल्या. तत्पूर्वी आई अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्यानंतर आई अंबाबाईची पालखी मार्गस्थ झाली. पालखीच्या मार्गावर विविध पारंपरिक वाद्ये, शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ, ढोलताशा पथके, धनगरी ढोलपथके पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते.
राज्य शासनाच्या सहभागाने यावर्षीचा कोल्हापूर दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा झाला. सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार यांच्यासह निघालेल्या मिरवणुकीमुळे वातावरणाला राजेशाही बाज आला. ऐतिहासिक भवानी मंडप परिसर भाविक, पर्यटक आणि नागरिकांनी गजबजला होता. नवरात्रोत्सवासाठी नेमन्यात आलेले कोल्हापूर पोलीस मित्र आणि स्वयंसेवकांचे पथक पालखी मार्गावर शिस्त राखण्याच्या कामी होते. या पथकामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. त्याबरोबरच पोलीस दल, होमगार्ड, मराठा कमांडो, व्हाईट आर्मीचे जवान देखील या सोहळ्यासाठी तैनात होते.
पालखी सोहळ्यामध्ये देखावे, ऐतिहासिक विषयावरील चित्ररथ, शाहिरी पोवाडे, तोफ, बंदुकीच्या फैरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
कोल्हापूरातील नामवंत मल्लांची उपस्थिती या महोत्सवाला होती. पालखी मार्गामध्ये महालक्ष्मी प्रतिष्ठान, करवीर नाद, श्रीमंत प्रतिष्ठान ढोल ताशा पथके, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली.
शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बंदुकीच्या फैरी झाडून महाराजांना मानवंदना दिली गेली. टाऊन हॉल चौकामध्ये न्यु सिकेई असोसिएशन ऑफ मार्शल आर्ट च्या खेळाडूंनी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.
दसरा चौकातील मैदानात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तिन्ही पालख्या दसरा चौकात पोहोचल्यानंतर श्री शाहू महाराज छत्रपती व त्यांचे कुटुंबिय याठिकाणी पोहोचले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीची पूजा झाल्यानंतर आपट्याच्या पानांचे सोने लुटण्यात आले.
सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन शाहू महाराज जुन्या राजवाड्याकडे मार्गस्थ झाले. दसरा महोत्सव समिती, जिल्हा प्रशासन आणि दसरा सोहळा संयोजन समितीच्या नियोजनाने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कोल्हापूरातील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा दिमाखात पार पडला.