no images were found
सोनी सबवरील कलाकार सांगत आहेत त्यांच्या नवरात्रीच्या आठवणी आणि परंपरा
नवरात्रीचा सण आला आहे आणि सोबत अनेक देशवासीयांसाठी आनंद, भक्ती आणि हर्षोल्लास घेऊन आला आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या सणाच्या निमित्ताने दुर्गा मातेची पूजा आणि भक्ती केली जाते. भारतीयांच्या मनात या पर्वाचे विशेष स्थान आहे. सोनी सबवरील कलाकार नवरात्र साजरी करण्याचे आपले संस्मरणीय अनुभव शेअर करत आहेत. कुटुंबासोबत उपवास करण्यापासून ते रात्रभर गरब्याच्या लयीत धुंद होण्याच्या या आठवणी या पर्वाचे वैशिष्ट्य आणि लोकांच्या मनातील या उत्सवाचे स्थान याचे प्रतिबिंब दर्शवितात.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी प्राची बंसल म्हणते,
“माझ्या मनात नवरात्रीचे विशेष स्थान आहे. माझी आई नेहमी पूजा करते आणि लहानपणापासून मी देवी मातेची भक्त आहे. आईसोबत उपवास करणे, कुमारिका भोजन घालणे या माझ्या आठवणी आहेत. यावर्षी ‘श्रीमद् रामायण’ च्या शूटिंगमुळे मला मैत्रिणींसोबत गरब्याच्या रात्री जागवता येणार नाहीत, पण तरीही नवरात्रीची सकारात्मक ऊर्जा आणि देवीची भक्ती यामुळे हा सण लक्षणीय ठरतो.”
वागले की दुनिया मालिकेत वंदनाची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते,
“नवरात्रीमुळे सगळीकडे हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण होते, ते मला खूप आवडते. माझ्यासाठी, सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा भाव ठेवणे हे या उत्सवाचे सार आहे. मला शांततेत ईश्वराशी जवळीक साधताना आनंद मिळतो. माझ्या आई-वडीलांच्या घरी हवन असते, ज्यामुळे पवित्र वाटते. या नऊ दिवसांत एक आनंद आणि ऊर्जा भरलेली असते, जी मला फार आवडते.”
‘बादल पे पांव है’ मालिकेत पूनम खन्नाची भूमिका साकारणारी शेफाली राणा म्हणते,“नवरात्र हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा सण आहे. नवरात्रीत मी फुले, रांगोळी आणि दिव्यांनी घर सजवते आणि पारंपरिक पदार्थ बनवते. दुर्गा माता ही स्त्री शक्तीचे स्वरूप आहे. गरब्याच्या आणि दांडियाच्या माध्यमातून तिची आराधना करताना मला आनंद मिळतो. नवरात्र केवळ आनंद साजरा करण्याचा सण नाही, तर स्त्रीचे दिव्यत्व, तिचे सामर्थ्य आणि दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय साजरा करण्याचा उत्सव आहे. समाजाशी एकरूप होऊन आध्यात्मिक उन्नती साधण्याचा हा सण आहे, त्यामुळे माझ्यासाठी त्याचे विशेष स्थान आहे.”