Home शैक्षणिक तर्कतीर्थांच्या साहित्याच्या अनुषंगाने विद्यापीठात बहुविद्याशाखीय परिषद घेणार: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

तर्कतीर्थांच्या साहित्याच्या अनुषंगाने विद्यापीठात बहुविद्याशाखीय परिषद घेणार: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

6 second read
0
0
15

no images were found

तर्कतीर्थांच्या साहित्याच्या अनुषंगाने विद्यापीठात बहुविद्याशाखीय परिषद घेणार: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

कोल्हापूर (प्रतीनिधी): तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे अतिव्यापक संकलन व संपादन करून डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी सागरासारखे विशाल कार्य साकारले आहे. या साहित्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात बहुविद्याशाखीय ज्ञान परिषद आयोजित करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज जाहीर केले.

ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अत्यंत विक्रमी वेळेमध्ये मराठी विश्वकोशाचे पहिले अध्यक्ष तथा प्राच्यविद्यापंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे संकलन करून ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मया’चे १८ खंड संपादित केले आहेत. त्यांचे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने मुंबईत प्रकाशन करण्यात आले. या १८ खंडांचा पहिला संच आज डॉ. लवटे यांनी शिवाजी विद्यापीठास सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी तो स्वीकारला. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

डॉ. शिर्के म्हणाले, तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचे संकलन करणे हे मोठ्या जबाबदारीचे काम डॉ. लवटे यांनी अत्यंत ध्येयनिष्ठपणे अल्पावधीत साकारले आहे. समितीच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा महाप्रकल्प हाती घेऊन तो तडीस नेण्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. त्याबद्दल डॉ. लवटे हे अभिनंदनास पात्र आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी या खंडांचा पहिला संच शिवाजी विद्यापीठास अर्पण केला, यातून त्यांचा विद्यापीठाप्रती कृतज्ञभावच दिसून येतो. त्यांनी साकारलेल्या या कार्याच्या अनुषंगाने तर्कतीर्थांच्या वाङ्मयाचा साकल्याने वेध घेणारी परिषद विद्यापीठात आयोजित करण्यात येईल. या परिषदेस राज्यभरातील तज्ज्ञ अभ्यासक व संशोधकांना आमंत्रित करण्यात येईल. या माध्यमातून नव्या पिढीसमोर तर्कतीर्थांचे कार्य नव्याने मांडता येईल. त्यांना तर्कतीर्थांच्या कार्याशी जोडता येईल.

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी डॉ. लवटे यांनी साकारलेले कार्य असाधारण स्वरुपाचे असून महाराष्ट्राच्या भावी पिढ्या त्यांच्याप्रती कृतज्ञ राहतील, असे गौरवोद्गार काढले.डॉ. रणधीर शिंदे यांनी सध्याच्या संकीर्ण भोवतालामध्ये डॉ. लवटे यांनी हा महाप्रकल्प साकारला, याचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले. तर्कतीर्थांच्या ज्ञानविश्वाचा समग्र आवाका या त्यांच्या कार्यातून सामोरा आला असून हा आंतरविद्याशाखीय दृष्टीचा ऐवज असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. लवटे यांच्यासह मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी समग्र वाङ्मय खंडांचा पहिला संच कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्याचप्रमाणे डॉ. लवटे यांनी या समग्र खंडांचे समालोचक डॉ. अशोक चौसाळकर यांनाही दुसरा संच भेट दिला.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शाल, श्रीफळ आणि ग्रंथभेट देऊन डॉ. लवटे यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार केला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, डॉ. विश्वास पाटील उपस्थित होते.

तर्कतीर्थांच्या समग्र वाङ्मय खंडांविषयी थोडक्यात…

डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी साकारलेल्या ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मया’च्या १८ खंडांमधील पहिला खंड हा मराठी विश्वकोश नोंदसंग्रहाचा आहे. दुसऱ्या ते पाचव्या खंडांमध्ये भाषणसंग्रह असून त्यात व्यक्ती व विचार, धर्म, साहित्य आणि संस्कृती या विषयांवरील भाषणांचा समावेश आहे. सहावा खंड मुलाखतसंग्रह आहे. सात ते नवव्या खंडात लेखसंग्रह असून तात्त्विक व राजकीय, सांस्कृतिक आणि संकीर्ण लेखांचा त्यात समावेश आहे. दहावा खंड प्रस्तावनासंग्रह, अकरावा पुस्तक परीक्षण संग्रह, बारावा संस्कृत-मराठी प्रबंध व चरित्र संग्रह, तेरावा पत्रसंग्रह आहे. चौदा व पंधराव्या खंडात संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची दोन भागांत आहे. सोळावा खंड हा भारतस्य संविधानम् अर्थात भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत भाषांतराचा आहे. सतरावा खंड तर्कतीर्थांवरील स्मृतिगौरव लेखसंग्रह तर अठरावा खंड साहित्यसमीक्षा लेखसंग्रहाचा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…