no images were found
कवितेत राष्ट्र परिवर्तनाची ताकद असते – डॉ. व्ही. एन. शिंदे
कोल्हापूर(प्रतिनिधी) : येथील कवी चंद्रकांत डोंगरे लिखित ‘निसर्गात रमताना’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिंदे म्हणाले, कवीला निसर्गाची भाषा वाचता आली पाहिजे. यातून मानवी भावसबंध प्रकट होत असतो. विशेषता निसर्गात जो माणूस रमतो तो खूप सुंदर असे निरोगी जीवन जगतो. यामुळे त्यांच्या अचूक निरीक्षणात ज्या कविता निर्माण होतात अशा कवीतेतून राष्ट्र परिवर्तनाची ताकद निर्माण होत असते. त्यामुळे अशा कवितेंना समाजात सर्वश्रेष्ठ स्थान असते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी मोहन कवठेकर, शिये येथील करूणालय बालगृहाचे संस्थापक आनंद बनसोडे, वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. कवठेकर म्हणाले, या पुस्तकातील चारोळ्या अल्पक्षरी असल्यातरी त्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. सुंदर देखणे मुखपृष्ठ आपल्यास पहावयास मिळते. दोन नारळची झाडे म्हणजे चिमाणा चिमणी राजराराणीच्या संसाराच प्रतीक पहावयास मिळते. सकाळचा सूर्योदय पहावयास मिळतो. पक्षी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडत असल्याचे दाखविले आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यामध्ये अंतरिचे भाव रेखाटले आहेत शिवाय कवींनी त्यांच्या सुक्ष्मनिरीक्षणातून रानातला गंध शब्दात पेरला आहे. या संग्रहाची वैशिष्टये म्हणजे ओघवती भाषाशैली, उदक प्रवाही, उच्चारासाठी सोपी, सर्व वयोगटाला समजेल उमगेल अशी सोपी भाषा व प्रबोधनात्मक विचार दिसून येतात.
शर्मिष्ठा ताशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये, या चारोळी संग्रहाबाबत आपले निरीक्षण मांडले. त्या म्हणाल्या, डोंगरे यांच्या लिखाणात निसर्गाचे निकोप, निरामय, हळव्या भावना असे निसर्गाचे निखळ रूप वाचायला मिळते. हा चारोळीसंग्रह मराठी वाचकांना नक्कीच आवडेल असा मला विश्वास वाटतो.
कवी श्री. डोंगरे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या लिखाणामागची प्रेरणा व एकूण लिखाणामागची भूमिका सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी केले. काही प्रातिनिधीक कविंताचे वाचन मराठी सिनेअभिनेत्री श्रुतकिर्ती सावंत व ऋतुजा डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, यशवंतराच चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर विभागाचे माजी संचालक डॉ. दादासाहेब मोरे, लेखिका विमल मोरे, वनिता कदम, विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख मा.डॉ.संजय लठ्ठे, सुर्यकांत डोंगरे, विक्रांत पाटील, पंढरी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैदेही जोशी यांनी केले. आभार ऋषीप्रसाद डोंगरे यांनी मानले.