
no images were found
पत्रकारांच्या मागण्यांसाठी प्रसंगी संघटना रस्त्यावर उतरेल : विवेक पाटील
कोल्हापूर : राज्यातील पत्रकारांच्या समस्यांत सातत्याने वाढ होऊ लागली आहे; वयोवृद्ध पत्रकारांना पेन्शन, अधिस्वीकृति पत्र, आरोग्य समस्या, सातत्याने उद्भवणारे निकडीचे प्रश्न, पत्रकारांवर होणारे हल्ले अशा समस्यांवर मात करण्यासाठी इंडियन प्रेस क्लब ही संघटना कार्यरत आहे. आपल्या मागण्यांसाठी वेळ पडल्यास संघटना रस्त्यावर उतरेल, असे प्रतिपादन इंडियन प्रेस क्लबचे केंद्रीय अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले .
इंडियन प्रेस क्लब या संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर येथील न्यू शाहूपुरी येथे ज्येष्ठ पत्रकार महेश कुर्लेकर काका यांचे हस्ते व साहित्यिक चद्रकांत शहासने यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय अध्यक्ष विवेक पाटील, राज्याध्यक्ष शहाजहान आत्तार आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. २ ऑक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्लवन तसेच महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अध्यक्ष विवेक पाटील आपल्या स्वागतपर भाषणात पुढे म्हणाले की, या संघटनेचा लवकरच व्यापक विस्तार करण्यात येणार आहे.
संघटनेचे राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार म्हणाले की, ही संघटना केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड आदी राज्यात लवकरच पोहचणार आहे; तर राज्यातील पहिले पत्रकार अधिवेशन सर्वाचे आराध्य दैवत असणारे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्य नगरीत होणार असून त्याला मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, पालक मंत्री, माहिती प्रसारण मंत्री सर्व जेष्ठ पत्रकार आदिंना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच राज्यातील पत्रकारांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करू, असे आश्वासन राज्य उपाध्यक्ष हाजी अस्लमभाई यांनी दिले. प्रमुख पाहुणे चंद्रकांत शहासने यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून व सहकार्यातून पुणे येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. तर केंद्रीय कार्याध्यक्ष हाजी अब्दुलभाई शेख यांनी प्रास्ताविक केले.
राज्य संघटक म्हणून अर्चना बड़नाल याची निवड करण्यात आली. त्यावेळी बोलताना विधवा महिला, अनाथ बालक, अपंग यांच्यासाठीही सामाजिक कार्य करण्यात येणार असून सामाजिक बांधिलकी म्हणून हे उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जावेद भाई मुजावर, प्राजक्ता किणे, जेष्ठ पत्रकार विकास पाटील, विनोद नाझरे, बाबुभाई शेख, बाबासाहेब सपकाळ, प्रदीप कोले, श्रीमती अर्चना वाडनाल, अशोक पदमने, अजहरुद्दीन मुल्ला आदी मान्यवर तसेच विविध जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेच्या वाढत्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.