
no images were found
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या दंडव्याज माफी संधीचा लाभ घ्या
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोटियम बँक फायनान्स या दोन्ही योजनांसाठी मंडळाने खादी आयोगाच्या परिपत्रकान्वये दंडव्याज माफी जाहीर केली आहे. कर्जदार कारागिरांनी आपल्यावरील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील वसुली तरतुदीअंतर्गत कायदेशीर कार्यवाही करु नये यासाठी फक्त मुद्दल व त्यावरील सरळ व्याज यांचा एकरकमी भरणा दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्राधान्याने करावा आणि दंडव्याज माफी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत खादी आयोग निधी योजनेअंतर्गत सन 1962 ते सन 1995 पर्यंत तसेच सन 1995 ते सन 2001 पर्यंत कन्सोर्टियम फायनान्स अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जात होते. उपरोक्त कर्जांची अंशत: वसुली झाली आहे. काही कारागिरांचे कर्ज थकीत राहिल्यामुळे संबंधितांवर महसुली वसुली प्रस्ताव (आर.आर.सी.) बाबत कार्यवाही करुन त्यांच्या महसूल दस्तऐवजामध्ये शासकीय थकबाकीची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कर्जदारांनी आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्रीमती विमला यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.