
no images were found
शिवाजी विद्यापीठात शुुक्रवारी महिला सन्मान परिषद
कोल्हापूर( प्रतिनिधी): शिवाजी विद्यापाठाचा मास कम्युनिकेशन विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी एकदिवसीय महिला सन्मान परिषद आयोजित करण्यात आली आहे. वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही परिषद होईल.
गेल्या काही दिवसांत महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेत पुणे येथील मिलिंद चव्हाण हे ‘लैंगिक हिंसा, सत्ता आणि वर्चस्व’, अॅड. रमा सरोदे ‘लैंगिक हिंसा, कायदा आणि आपली जबाबदारी’ तर आरती नाईक ‘निकोप समाज व्यवस्था आणि पुरुषभान’ या विषयांवर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. परिषदेत सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या परिषदेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विवेक वाहिनीचे सदस्य तसेच अन्य समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले आहे.