no images were found
डॉक्युमेन्ट्रीसाठी तंत्रापेक्षा आशय महत्त्वाचा: जयसिंग चव्हाण
कोल्हापूर( प्रतिनिधी):डॉक्युमेन्ट्री हा फिल्मपेक्षा वेगळा प्रकार आहे. डॉक्युमेन्ट्रीसाठी तंत्रापेक्षा आशय महत्त्वाचा असतो, असे मत ‘ब्रदरहूड’ या डॉक्युमेन्ट्रीचे दिग्दर्शक जयसिंग चव्हाण यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात बी. ए. फिल्म मेकिंग या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी जयसिंग चव्हाण यांच्या ‘ब्रदरहूड’ या डॉक्युमेन्ट्रीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत हा कार्यक्रम झाला.
चव्हाण म्हणाले, डॉक्युमेन्ट्रीसाठी विषय निवडणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आपल्या आसपासच्या समस्यांकडे डोळसपणे पाहिल्यास विषय मिळणे अवघड नाही. कोल्हापूर जिल्ह्यात डॉक्युमेन्ट्रीसाठी विषयांची अजिबात वानवा नाही. फक्त त्यासाठी आपल्या अवतीभोवती गांभीर्याने पाहण्याची आणि लोकांत मिसळण्याची सवय असणे आवश्यक आहे.
डॉक्युमेन्ट्री हा प्रकार तंत्रापेक्षा आशयावर जास्त प्रभाव टाकतो. आपल्याकडे कमी साधने असली आणि तंत्राच्या बाबतीत खूप काही करता आले नाही तरी आशय मात्र तगडा असला पाहिजे. आपल्याला जे सांगायचे आहे, ते नेमकेपणाने सांगता आले पाहिजे. वस्तुस्थिती सांगत असताना त्यामध्ये तंत्राचा मारा न होत स्वच्छपणे ते सांगता आले पाहिजे, असेही चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना चव्हाण यांनी उत्तरे दिली. स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.