
no images were found
चेंबुर पोलीस ठाण्यात छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे विरोधात चेंबुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईतील चेंबुरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुजबळ यांच्यासोबतच अन्य दोघांवरही टेकचंदानी यांनी तक्रारीत आरोप केला आहे. उद्योगपती टेकचंदानी यांनी फोन आणि मेसेजद्वारे धमकी दिल्याचा आरोप भुजबळ यांचेवर केला आहे.
‘मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली’, असा आरोप व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी यांनी पोलीस तक्रारीमध्ये केला असून छगन भुजबळ यांचे २ व्हिडीओ ललितकुमार यांनी फॉरवर्ड केले होते. हिंदू धर्माविरोधात भुजबळांनी भाष्य केल्याचा दावा करत हे व्हिडीओ फॉरवर्ड केल्यामुळे आपल्याला धमकी देण्यात आल्याचा आरोप ललितकुमार यांनी केला आहे.
चेंबुर पोलिसांकडून ललितकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कलम 506 अन्वये छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास चेंबुर पोलीस करत आहेत.
छगन भुजबळ यांचेकडून देवी सरस्वतीची शाळेत पुजा करण्यावरुन केलेलं एक विधान चर्चेत आलंय. शाळेत देवी सरस्वतीची पुजा का करावी? त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची पुजा का करु नये? देवी सरस्वती मातेनं फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं, असं म्हटलं होतं. या वक्तव्यामुळे वाद उद्भवलेला होता.
या उद्भवलेल्या वादानंतर नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी आपण आपल्या विधानावर ठाम आहोत, असं स्पष्ट करत आपली भूमिका व्यक्त केली होती. आता छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबुर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. चेंबुर पोलिस आता याप्रकरणी नेमकी कारवाईसंदर्भात कोणती पाऊले उचलतात हे महत्त्वाचं ठरेल.