
no images were found
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी रक्तदान शिबीर व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कोल्हापूर : जिल्हा परिषद, जागर फौंडेशन कोल्हापूर आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर-निंबाळकर फौंडेशन,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबीर आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये जवळपास 100 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, तपासणीअंती 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कनिष्ठ लेखाधिकारी सुबराव पवार यांच्या सेवानिवृत्तीच्यावेळी गरजू, गोरगरीब मुलांना वाटण्यासाठी शालेय साहित्य स्विकारले होते. त्या साहित्याचे वाटप जिल्ह्यातील १२ तालुक्यातील डोंगराळ भागातील प्रत्येकी एका शाळेची व मेन राजाराम हायस्कूल कोल्हापूर अशी १३ शाळांची निवड केली होती. या साहित्याचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा शिंदे-देसाई, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.योगेश साळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणवीर, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे, इतर विभागाचे खातेप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्तिकेयन एस. यांनी रक्तदान शिबीर आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत संयोजकांचे कौतुक केले आणि सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन साथीचे आजार निर्माण होत आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक रुग्णांना रक्ताची खूप मोठी गरज असते अशा प्रसंगी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजन करावीत, ही काळाची गरज आहे, असे सुचित करुन एका रक्तदात्यामुळे तीन व्यक्तींना जीवदान मिळू शकते, असे सांगितले.
श्रीमती शेंडकर म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनंतर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे एक मोठे व्यक्तीमत्व कोल्हापूर जिल्ह्याने देशाला दिले आहेत. एक विद्यार्थीप्रिय प्राचार्य, कोल्हापूर जिल्ह्याचे पहिले खासदार आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी ज्यांनी शिक्षण चळवळ सुरु केली ते बहुआयामी व्यक्तिमत्व होते. प्राचार्य खर्डेकर यांनी समाजातील शोषित, वंचित घटकाला त्यांनी सर्वतोपरी मदत केली. तर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी वंचित घटकामध्ये शिक्षण, स्वाभिमान, देशप्रेम अशा गुणांचे आपल्या साहित्यकृतीतून रोपण केले, असे गौरवोद्वगार आरोग्य व कुटूंब कल्याण केंद्राचे प्राचार्य डॉ.साळे यांनी काढले.
यावेळी बॅरिस्टर खर्डेकर पुस्तकाचे लेखक प्रा.बी.जी. मांगले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुबराव पवार, विक्रमसिंह खर्डेकर, चंद्रसेन खर्डेकर, रफिक मुलाणी, बाळासाहेब मोरे, विजय पाटील, ओंकार पाटील, रणजीत पाटील, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालकन सुषमा पाटील यांनी केले. तर आभार नितीन देशमुख यांनी मानले.