no images were found
‘फोर्ब्स‘ने घेतली मराठमोळ्या ‘पल्याड‘ चित्रपटाची दखल
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरत पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘फोर्ब्स’ मासिकानं घेतली आहे. ‘फोर्ब्स’नं दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांची संपूर्ण मुलाखत आणि चित्रपटाविषयीची माहिती त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सने घेतलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांचा सोबत चर्चा करून चित्रपटाच्या संपूर्ण प्रवास समजून घेतलेला आहे. त्यामुळे आज सगळीकडे ‘पल्याड’च्या नावाचा डंका वाजू लागला आहे. ‘पल्याड’नं चित्रपटसृष्टीसोबतच रसिकांचंही लक्ष वेधण्यात यश मिळवलं आहे.
‘फोर्ब्स’सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य मासिकात मराठमोळ्या दिग्दर्शकाची मुलाखत प्रकाशित होणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. शैलेश दुपारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. के सेरा सेरा डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून ४ नोव्हेंबर रोजी ‘पल्याड’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यात, २५ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार तसेच रुचित निनावे यांची वेशभूषा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे आणि याचे संपूर्ण श्रेय वेशभूषाकार विकास चहारे यांना जाते. चित्रपटाची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बल्लारशहामधील बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, गजेश कांबळे आदींच्या भूमिका आहेत.