no images were found
उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर, : उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ६ महिने प्रशिक्षणासाठी अर्ज करावा. तसेच शासकीय,निमशासकीय, खाजगी, सेवा क्षेत्र आस्थापना यांनी दिनांक ९ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार Internship ची पदे या विभागाच्या संकेतस्थळावर अधिसूचित करावीत. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३१-२५४५६७७ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे अनुभव देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी दिनांक ९ जुलै, २०२४ रोजीचे शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय,स्वराज्य संस्था, महाविद्यालये, खाजगी आस्थापना, तसेच संबंधित तालुका/जिल्हा/विभाग/राज्यस्तरीय कार्यालये या योजनेंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतात, तसेच पात्रताधारक रोजगार इच्छुक उमेदवार व आस्थापनांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना/उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के एवढे उमेदवार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय,निमशासकीय आस्थापना, उद्योग/महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के एवढे उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.
उमेदवाराचा कार्य प्रशिक्षण कालावधी ६ महिन्याचा राहील, या कालावधीत उमेदवाराला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पुढीलप्रमाणे एचएससी (१२ वी पास) करिता ६ सहा हजार रूपये, आयटीआय/पदविका करिता ८ हजार रुपये, पदवीधर / पदव्युत्तर करिता १० हजार प्रतीमहा विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीच्या आधारे थेट बँक खात्यात ऑनलाईन (DBT) पध्दतीने अदा करण्यात येईल. तसेच कार्य प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधीत आस्थापनाकडून प्रशिक्षण केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येईल.