no images were found
काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजु बी शासन अनुदान योजना 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर : राज्यातील काजु उत्पादक शेतक–यांना काजु बी साठी शासनाकडुन वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतक–यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवुन सन 2024च्या काजु हंगामासाठी काजु उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजु उत्पादक शेतक–यांसाठी काजु बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणुन महाराष्ट्र राज्य काजु मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, 7/12 उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याचा क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इ. तपशीलासह अर्ज महाराष्ट्र राज्य काजु मंडळाकडे 31 ऑगस्ट 2024 पुर्वी सादर करावेत, असे आवाहन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.
राज्यातील काजु उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील. त्यासाठी काजु उत्पादक शेतक-यांच्या 7/12 वर काजु लागवडी खालील क्षेत्र / झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या उत्पादनक्षम काजुच्या झाडांची संख्या व त्यापासुन प्राप्त काजु बी उत्पादन हे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बीची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक आहे.
कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यामधील संबंधित काजू उत्त्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य, विभागीय कार्यालयांकडे व अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करुन अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहनही श्री. कदम यांनी केले आहे.