no images were found
‘बार्टी’च्या माध्यमातून अधिछात्रवृत्ती अदा करण्याची कार्यवाही सुरू – गुलाबराव पाटील
मुंबई : राज्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) एमपीएससी, यूपीएससी, आयबीपीएस, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, सैन्यदल यांच्या पूर्व परीक्षांच्या प्रशिक्षणाचे काम केले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2021 अंतर्गत एकूण 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिछात्रवृत्ती रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य धीरज लिंगाडे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत अभिजित वंजारी, ज.मो.अभ्यंकर, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, बार्टीसाठी 2021-22 मध्ये अर्थसंकल्पात 300 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 255 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. 2022-23 मध्ये 245 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 245 कोटी वितरीत करण्यात आले. तर 2023-24 मध्ये 350 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यातील 350 कोटी रुपये वितरीत करण्यात येऊन 326 कोटी रुपये खर्च झाले आहेत. चालू वर्षी 2024-25 मध्ये 300 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बार्टी’ मार्फत 2007 पासून 85,512 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून आतापर्यंत 21,093 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.