
no images were found
माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
कोल्हापूर/प्रतिनिधी,: ईझी एज्युकेशन्स, बंडोपंत नाईकवाडे मेमोरीयल फौंडेशन, कोल्हापूर वुई केअर, एनजीओ कंपॅनशन आणि आमचा गाव आमचा विकास यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान येत्या रविवारी दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी दहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार असल्याची माहिती ईझी एज्युकेशन्सचे प्रमुख किशोर शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याशिवाय पर्याय नाही. यशाला गवसणी घालण्यासाठी अपार मेहनतीबरोबर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठीच प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले वक्ते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
व्याख्यानासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी म्हाडा, पुणेचे अशोक पाटील, तसेच अभ्यास करताना बौद्धिक व मानसिक ताणतणाव यावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल सौ.शाल्मली रानमाळे- काकडे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या व्याख्यानाचे आयोजन ईझी एज्युकेशन कोल्हापूर, हजारो अधिकारी घडविलेले नर्मदा व चैताली प्रकाशनचे लेखक व प्रकाशक अमृत काळोखे यांनी केले आहे. या सोहळ्यादरम्यान शालेय परीक्षा व स्पर्धा परीक्षेसाठी एज्युकेशनच्या अँड्रॉइड मोबाईल ॲपचे लॉन्चिंग होणार आहे.
कार्यक्रम विनामूल्य असून सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेस मिलिंद धोंड, सुलोचना नायकवाडे, प्रभाकर पाटील , संजय काकडे, सुभाष पाटील, शितल शहा आदी उपस्थित होते.