
no images were found
युवा उद्योजक रौनक शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बुद्धीबळ प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):- बुद्धिबळ या भारतीय खेळाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्या बौद्धिक क्षमतेचे योग्य नियोजन व्हावे, या उद्देशाने श्री संभवनाथ जैन श्वेतांबर संघ, गुजरी , कोल्हापूर यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली नवकार चेस फाउंडेशन मार्फत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . सदरचे बुद्धीबळ प्रशिक्षण वर्ग दिनांक २,३ व ४ जुलै रोजी संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये मरुधर भवन, गुजरी येथे होणार आहेत. यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने बुद्धिबळ कसे खेळावे, आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत, बुद्धिबळापासून होणारे फायदे, त्यामुळे वैयक्तिक विकास कसा होऊन वैयक्तिक जीवनात देखील कसा फायदा होतो, याचे मार्गदर्शन तज्ञ व आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाईल. नवकार चेस फाउंडेशनचे प्रणेते, युवा उद्योजक व एस एम पी एस हॉस्पिटलचे रौनक पोपटलाल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे . तरी ज्यांना याचा लाभ घ्यावयाचा असेल , त्यांनी नवकार चेस फाउंडेशनचे अध्यक्ष व मॅनेजिंग ट्रस्टी रवी आंबेकर ९०४९२११८९४ या नंबर वर नाव नोंदणी करावी ,असे आवाहन जैन मंदिर संघाचे अध्यक्ष नरेंद्र अमिचंदजी राठोड व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव भरत चौगुले यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.