no images were found
आरोग्याची वारी पंढरीच्या दारी व आरोग्य विषयक दुरचित्रवाहीनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते उदघाटन
कोल्हापूर : आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अंतर्गत शासनामार्फत श्री क्षेत्र पंढरपुरकडे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात. याकरिता शासनाने जिल्ह्यातुन जाणाऱ्या व जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या दिंड्याना आरोग्य पथकाद्वारे उपचार व सेवा देण्यासाठी विशेष बाब म्हणुन प्रत्येक दिंडीला आरोग्य दुतामार्फत आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या दिंडीला जिल्हा परिषद मुख्यालय कोल्हापूर येथुन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपसंचालक, आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी व आरोग्य विषयक दुरचित्रवाहीनीचे जिल्हा परिषद मुख्यालय आवारात उदघाटन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातुन 69 दिंड्या जाणार आहेत. त्यापैकी मुख्य दिंडी कसबा सांगाव येथुन दि. 8 जुलै 2024 रोजी जाणार आहे. ही दिंडी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातुन मुक्काम करत पुढे जाणार आहे तसेच इतर दिंडीचा मार्ग हा कोल्हापूर ते पंढरपुरकडील मुख्य मार्गावरील गावातून जाणारा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुसज्ज अॅब्युलन्ससह 2 आरोग्य पथक व 15 आरोग्य दुतांमार्फत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
आरोग्य पथकामार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा पुढीलप्रमाणे-
आरोग्य पथकाची स्थापना, पथकामध्ये 1 समुदाय आरोग्य अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी, 1 आरोग्य सेवक व 1 वाहन चालक (अॅब्युलन्स सह) असे आहे. पथकातील अॅब्युलन्समध्ये सुसज्ज औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. आरोग्य पथक क्रं. 1 कोल्हापूर, पुणे, आळंदी मार्गे ते पंढरपुर या मार्गावर आरोग्य सेवा देणार आहे. आरोग्य पथक क्रं. 2 कसबा सांगाव, नृसिंहवाडी, सांगोला मार्गे ते पंढरपुर मार्गावर आरोग्य सेवा देणार आहे.
आरोग्य दूत मार्फत आरोग्य सेवा पुढीलप्रमाणे-
जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य दूतास प्रथमोपचार औषध किट, ड्रेसकोडसहीत ओळखपत्र देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकुण 69 दिंड्याची नोंद झालेली असून प्रत्येक दिंडीसोबत आरोग्य दूतामार्फत आरोग्य सेवा व प्रथमोपचार देण्यात येणार आहे. आरोग्य दूत हे कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दिंडीस आरोग्य सेवा पुरविणार आहेत व पुढील जिल्ह्यात त्या जिल्ह्याचे आरोग्य दूत दिंडीसोबत राहणार आहेत. वारकऱ्यांना शुध्द पिण्याचे पाणी पिण्याबाबत व उघड्यावरचे अन्न पदार्थांबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची जनतेमध्ये प्रसार व प्रसिध्दी करण्यासाठी दुरचित्रवाहिनीचे संच उपलब्ध करुन देण्यात आले असून आरोग्य विभागाच्या नाविन्यपुर्ण योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पाहेचवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्यालय आवारामध्ये आरोग्य विषयक दूरचित्रवाहिनी संच बसविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली आहे.