no images were found
ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्रांचे शाहू स्मारक भवनात २६ ते ३० जून दरम्यान प्रदर्शन
कोल्हापूर, : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत दरवर्षी ऐतिहासिक घटनांवर आधारित ऐतिहासिक व दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरविले जाते. यंदाचे वर्ष हे राजर्षी शाहू महाराजांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. या वर्षाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच २६ जून २०२४ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट व त्यांचे कार्य उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे पाच दिवसांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आले आहे. तसेच ” राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-२” या खंडाच्या सुधारित आवृतीचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन व पुस्तक प्रकाशन समारंभ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दि. २६ जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजता राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इतिहास प्रेमी नागरिक, संशोधक व सर्वसामान्य नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरालेखागार विभागाच्या सहाय्यक संचालक दिपाली पाटील यांनी केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची अधिकार सूत्रे स्वीकारल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला व “लोकांचा राजा” म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर देशाच्या इतिहासात एक अलौकिक स्थान निर्माण केले. अशा महापुरुषाचे चरित्र कथन करणा-या इतिहासावर या प्रदर्शनाव्दारे प्रकाश टाकण्यात येणार असून या प्रदर्शनात प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक विधान, महाराजांचे राज्यारोहण, शाहूकालीन पत्रव्यवहार, शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, दुष्काळी परिस्थितीत केलेले कार्य, शाहू महाराजांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, कला व क्रीडा, प्रशासकीय इत्यादी क्षेत्रातील कार्य, पर्यावरण रक्षणाकरीता केलेले कार्य तसेच महाराजांनी राज्यकारभार करताना वेळोवेळी घेतलेले निर्णय इत्यादी विषयासंदर्भातील महत्वाची निवडक कागदपत्रे ही शाहू कालीन दुर्मिळ छायाचित्रांसह याठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
हे प्रदर्शन दिनांक २६ ते ३० जून २०२४ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे भरविण्यात येत असून ते सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे, असेही श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.