no images were found
शिवाजी विद्यापीठात उद्यापासून तीनदिवसीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिर
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात उद्या (दि. २८) पासून ३० सप्टेंबरपर्यंत तीनदिवसीय राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन (N.R.D./S.R.D.) निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय मुंबई यांचे निर्देशान्वये सन २०२२-२३ या वर्षासाठी ही निवड चाचणी आहे. यापूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये सन २००६ व २०१६ या सालामध्ये सदर निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये महाराष्ट्रातील २९ विद्यापीठांमधून एकूण ३१० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यामध्ये १५३ मुले, १५७ मुली, ११ पुरुष कार्यक्रम अधिकारी व १० महिला कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहेत.
या शिबिरात राष्ट्रीय / राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची परेड, वजन, उंची, मुलाखत, इत्यादींच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.
या निवड चाचणी शिबिराच्या माध्यमातून ३१२ विद्यार्थ्यांमधून ५६ विद्यार्थी पश्चिम विभागीय (West Zone) संचलनासाठी, १४ विद्यार्थी राष्ट्रीय पथसंचलनासाठी (NRD) निवडले जाणार आहेत आणि उर्वरित ४२ विद्यार्थ्यांमध्ये आणखी ३८ विद्यार्थ्यांची निवड करून एकूण ८० विद्यार्थी राज्यस्तरीय पथसंचलनासाठी (SRD) निवडले जातील.
सदर शिबिराच्या निवड समितीमध्ये डॉ. कार्तिकेयन (क्षेत्रीय संचालक), डॉ. प्रशांतकुमार बनजे (राज्य संपर्क अधिकारी), अजय शिंदे (युवा अधिकारी), एनसीसी ऑफिसर्स, शारीरिक शिक्षण संचालक, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. अभय जायभाये सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.