no images were found
येत्या 14 वर्षांत एक धोकादायक लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो!
नवी दिल्ली : अंतराळातील घडामोडींकडे अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनसारख्या (नासा) अंतराळ संशोधन संस्था सतत लक्ष ठेवून असतात. त्यांना अंतराळात काही नवीन घडामोड दिसली की, त्याबाबत संशोधन करून निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. नुकतीच नासाने एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 14 वर्षांत एक धोकादायक लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो. नासाने एका काल्पनिक टेबलटॉप एक्झरसाईज रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.
हा महाकाय लघुग्रह पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता 72 टक्के आहे. नजीकच्या भविष्यात नेमका कोणता लघुग्रह पृथ्वीला धडक देणार आहे, हे अद्याप उघड झालं नाही. मात्र, 14 वर्षांच्या आत हे घडणं अपेक्षित आहे.
नासाने आपल्या रिपोर्टमध्ये या खगोलीय घटनेची संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे. 14.25 वर्षांनी म्हणजेच 12 जुलै 2038 रोजी हा लघुग्रह पृथ्वीला धडक देईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नासाने 20 जून रोजी जॉन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरी (एपीएल) येथे टेबलटॉप एक्झरसाईजची माहिती दिली होती. या एक्झरसाईजमध्ये नासा व्यतिरिक्त अमेरिकन सरकार आणि इतर देशांतील 100 हून अधिक विविध एजन्सींचाही सहभाग होता.
अशा धोक्याचा सामना करताना पृथ्वीच्या क्षमतेचं मूल्यांकन करता यावं यासाठी हा एक्झरसाईज करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. त्यात असंही म्हटलं आहे की, एक्झरसाईजदरम्यान काल्पनिक परिस्थितीसाठी विशेष प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं होतं. त्यामध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या लघुग्रहाचा शोध लावण्यात आला. प्राथमिक अभ्यासानुसार, हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 72 टक्के आहे. त्यासाठी सुमारे 14 वर्षे लागतील. या लघुग्रहाचा आकार, रचना आणि लाँगटर्म ट्रेजेक्टरीबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही.
नासाच्या वॉशिंग्टनमधील मुख्यालयातील प्लॅनेटरी डिफेन्स अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणाले की, एक्झरसाईजमधील सुरुवातीच्या अनिश्चिततेमुळे सहभागींना आव्हानात्मक परिस्थितींवर विचार करण्याची संधी मिळाली. एक मोठा लघुग्रह ही एकमेव नैसर्गिक आपत्ती आहे जिचं तंत्रज्ञानाद्वारे आधीच मूल्यांकन केलं जाऊ शकतं. त्यातून होणारं नुकसान टाळण्यासाठी माणूस मार्ग देखील शोधू शकतो आणि त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न केले जाऊ शकतात.आपल्या सूर्यमालेतील बहुतेक लघुग्रह हे गुरू आणि मंगळाच्या कक्षेतील मुख्य लघुग्रहांच्या पट्ट्यात स्थित आहेत आणि ते कधीही पृथ्वीच्या जवळ येत नाहीत. पण, अंतराळात भरकटलेले काही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही.