
no images were found
शिंदेंकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा;?
मुंबई- रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला काहीसा फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका समोर ठेवून राज्य सरकार काही कल्याणकरी योजना राबवत असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून दंड आकारला जात होता. तो यापुढे आकारला जाणार नाही. यासंदर्भातील निर्देश परिवहन विभागाचे आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. मात्र, नियम मोडल्यास नक्कीच दंड भरावा लागेल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी माझी भेट घेतली. यावेळी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ’ सुरू करण्यात येणार आहे.
या महामंडळाअंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल. चालकाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार देण्यात येतील. मुलांना शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल.
कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना तंत्रकुशल केले जाईल. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल. ६३ वर्षांवरील चालकांना ग्रॅज्युईटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी चालकाला प्रतिवर्ष ३०० रुपये म्हणजेच दरमहा २५ रुपये मात्र जमा करावे लागतील असे सांगितले.