
no images were found
मुसळधार पावसाचा मध्य महाराष्ट्राला इशारा !
पुणे : कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांत मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली आहे.
अर्धा महाराष्ट्र मॉन्सूनने व्यापला आहे. मात्र, उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींची दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत मंगळवारी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोड क्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना आणि विदर्भ, बुलडाणा जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’ कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. राज्यातील शेतकऱ्याचे पावसाकडे डोळे लागले होते. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या नव्हत्या. पाठोपाठ दुष्काळाची दाहकता वाढत गेली. मात्र, यंदा सुरुवातीच्या पावसामुळेच शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.