no images were found
केआयटीच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि. १० जून २०२४ रोजी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया’ या दोन महत्त्वाच्या विषयांना घेऊन मार्गदर्शनपर कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणी संपन्न झाला. सदर कार्यक्रमास १५०० विद्यार्थी पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी एकंदरच केआयटी ची ४१ वर्षांची शैक्षणिक पार्श्वभूमी,परंपरा, दिले जाणारे दर्जात्मककालानुरूप शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न याबाबत सुरवातीलाच आपले मनोगत व्यक्त केले.
पहिल्या सत्रामध्ये संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी बाबत माहिती दिली.भविष्यामध्ये बहुविद्याशाखीय अभियांत्रिकी ज्ञानातून आपण स्वतःची, समाजाची व देशाची उन्नती साधू शकतो हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारतासाठी अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःचा कौशल्य विकास नक्की साधू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या विस्तृत मार्गदर्शनात डॉ.मोहन वनरोट्टी पुढे म्हणाले ” संगणक क्षेत्रासह अन्य मेकॅनिकल,सिव्हील,इलेक्ट्रिकल,पर्यावरण काळजी या सर्व क्षेत्रांमध्ये आज उद्योग क्षेत्र विस्तारत आहे.हजारो स्टार्टअप च्या माध्यामातून अनेक अभियंता तरुण, तरुणी आकाशाला गवसणी घालत आहेत.अशा विस्तारणाऱ्या उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे मनुष्यबळ केआयटी सारख्या दर्जेदार महाविद्यालयातूनच घेण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत आहेत.” कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांनी पालकांनी अत्यंत काळजीपूर्वक भविष्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.दुसऱ्या सत्रात कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. अमित सरकार यांनी विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी महाविद्यालयाचे सुरू असलेले प्रयत्न,विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम,झालेले व होणारे कॅम्पस ड्राईव्ह याबाबत विस्तृत माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात केआयटी कॉलेजचे प्रवेश विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी ‘प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया -२०२४’ यावर विस्तृत माहिती दिली. त्यामध्ये इंजिनिअरिंग साठी असणारी पात्रता, सीट टाईप्स आणि डिस्ट्रीब्यूशन, इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया -२४ कधी सुरू होईल व त्याचे वेळापत्रक कसे असेल, प्रवेशासाठी असणाऱ्या ३ कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म कसे भरावे ? योग्य कॉलेज व योग्य विद्याशाखा कशी निवडावी ? प्रवेशासाठी लागणारी वेगवेगळी कागदपत्रे,शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती,केआयटी कडून दिली जाणारी शिष्यवृत्ती या बाबत सविस्तर माहिती दिली.तसेच नोंदणी करत असताना व ऑप्शन फॉर्म भरत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही यावरही मार्गदर्शन केले. पालकांनी केआयटी कॉलेज वरील विनामूल्य मार्गदर्शन केंद्राचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन डॉ. महेश शिंदे त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या अंतिम टप्प्यात केले.पालकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सई ठाकूर यांनी केले प्रा.अमर टिकोळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री साजिद हुदली ,सचिव श्री दीपक चौगुले, रजिस्ट्रार डॉ.मनोज मुजुमदार, अधिष्ठाता,विभाग प्रमुख,व प्रवेश प्रक्रिया समितीतील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.