no images were found
कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
कोल्हापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
महामंडळाच्या उद्देशानुसार व मातंग समाजातील तरुण-तरुणींचे वाढते शैक्षणिक प्रमाण विचारात घेता समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५०० प्रशिक्षणार्थींचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार असून निवड करण्यात येणाऱ्या संस्थांमार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील गरजू घटकांना विविध बाबीचे, प्रकारचे (ट्रेडचे) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणाऱ्या संस्थांसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत.
अर्ज करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांना व प्रशिक्षणार्थीना प्रस्ताव दाखल करताना, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे नियमांचे पालन व कार्यवाही करणे बंधनकार राहील. ज्या प्रशिक्षण संस्थांनी कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. त्याच संस्था आपला प्रस्ताव दाखल करता येणार आहे. जिल्हास्तरावर एका कोर्ससाठी प्रशिक्षण देण्यासाठी एकाच प्रशिक्षण संस्थेची निवड गुणांकन करुन करण्यात येईल.यासाठी प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीची बायोमेट्रीक प्रणालीव्दारे हजेरीची स्वतंत्र नोंद घेण्याची जबाबदारी प्रशिक्षण संस्थेची राहील. प्रशिक्षणार्थीनी निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणो अदा करण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परिक्षेला बसविण्याची जबाबदारी प्रशिक्षण संस्थेची राहील. त्याशिवाय प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही, तसेच प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार २०%, ३०%, ३०%, २०% च्या प्रमाणांत प्रशिक्षण फी अदा केली जाणार आहे. महामंडळाने वेळोवेळी केलेले बदल, अटीशर्ती व नियम प्रशिक्षण संस्थांना व प्रशिक्षणार्थीना लागू राहतील.
प्रशिक्षणार्थीसाठी नियम व अटी –
अर्जदार मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील असावा.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराला आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्यांचा तपशिल सादर करावा लागेल.
प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी महामंडळांचे जिल्हा कार्यालय, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डॉ. बाबर हॉस्पिंटलच्या मागे, ताराराणी पुतळयाजवळ, कोल्हापूर येथे संपर्क साधून विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह ३० जून २०२४ पर्यंत प्रस्ताव व अर्ज सादर करावेत. ३० जून नंतर प्राप्त प्रस्ताव, अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.