no images were found
चिन्मयी साळवीने मनातील पाण्याच्या भितीवर केली मात
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ ही मालिका त्यातील अनोख्या आणि प्रभावशाली तसेच प्रेक्षकांना त्यांच्या अनुभवांचे प्रतिबिंब दाखवणारी कथानके सादर करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. सध्याच्या भागांमध्ये आजकालची तरुण मुले आणि त्यांचे माता-पिता यांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट सादर होत आहे. आजकाल ‘ग्रॅज्युएशननंतर मित्र-मैत्रिणींसोबत गोव्याचा प्रवास केलाच पाहिजे!’ हा एक रूढ समज झाला आहे. या कथानकात सई (चिन्मयी साळवी) आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गोव्याच्या प्रवासाचे आयोजन करून गोव्याला जाते. आपल्या आई-वडिलांना म्हणजे राजेश आणि वंदनाला (सुमित राघवन – परिवा प्रणती) पटावे यासाठी थोडे खोटेही बोलते. आपल्या मुलीला गोव्याला पाठवण्याच्या बाबतीत खरं तर त्या दोघांची मनं आधी साशंक असतात, पण ती त्या दोघांना पटेल असे सांगून त्यांच्या मनातील शंका दूर करते. ही कहाणी या गोष्टीवर प्रकाश टाकते की, कधी कधी आपल्या मुलांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी थोडी सूट द्यायला हवी.
ही गोष्ट पडद्यावर जिवंत करण्यासाठी ‘वागले की दुनिया’च्या टीमने मुंबईतच गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याचे वातावरण उभे केले. नेहमी सेट्सवर चित्रीकरण करणारा मालिकेचा संच शूटिंगसाठी वसई येथील राजोडी बीचवर पोहोचला. चिन्मयी साळवी, तिचा खास मित्र विवान बनलेला नमित शाह आणि त्यांच्या कंपूतल्या इतर मंडळींनी बीचवर शूटिंग करताना खूप धमाल केली आणि या अनोख्या अनुभवाचा आनंद घेतला.
सखी वागलेची भूमिका करणारी चिन्मयी साळवी हिने बीचवर शूटिंग करण्याचा आपला अनुभव सांगताना म्हटले, “ही गोष्ट पडद्यावर बघायला तर छानच आहे, पण शूटिंग करायला तर त्याहूनही जास्त मजा आली. वसई येथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही दोन दिवस शूटिंग केले. सुरुवातीला मला पाण्याची भीती वाटत होती, पण पाण्यात बुडण्याचे एक दृश्य होते, ज्यासाठी मला माझ्या भितीवर मात करावी लागली. महत्त्वाची बाब ही आहे की, या संपूर्ण शूटिंगमध्ये आमच्या टीममधल्या सगळ्या लोकांचे लक्ष आमच्या सुरक्षेकडे होते. बुडण्याचे जे दृश्य होते, त्यावेळी मी एकटीच पाण्यात नव्हते, तर दिग्दर्शक, DOP आणि सेफ्टी गार्ड देखील माझ्यासोबत होते. गरमी खूप जास्त होती आणि त्वचा रापण्याची भीती होती, पण एकंदर हा अनुभव खूप छान होता. आमच्या दैनंदिन समयसारणीतून मिळालेली ही विश्रांती मनाला टवटवी देणारी आणि नेत्रसुखद देखील होती.”