
no images were found
मतमोजणी ठिकाणी आवश्यक तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतमोजणी ४ जून रोजी होणार असून या अनुषंगाने मतमोजणी ठिकाणी आवश्यक तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मतमोजणीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी, कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मतमोजणीवेळी उकाडा, पाऊस आदी बाबत विचार करून नियोजन करा. मतमोजणीसाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. तयारीसाठी आपल्याकडे दहा दिवस आहेत परंतू सर्व कामे २५ मे पर्यंत पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत उपस्थितांना दिल्या. यावेळी बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, अतिरीक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका राहूल रोकडे, पोलीस उपअधीक्षक अजित टीके उपस्थित होते.
कोल्हापूर ४७ व हातकणंगले ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी अनुक्रमे रमणमळा व राजाराम तलाव येथे होणार आहे. येथील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक वैद्यकिय सुविधा, नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा अल्पोपहार जेवण, माध्यम कक्ष आदीबाबत नियोजनाच्या अनुषंगाने यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांनी माहिती दिली. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी मतमोजणी करताना सद्याच्या तापमानाचा विचार करून पंखे, कूलर आदी व्यवस्था वेळेत उभारणी करा, नागरिकांसाठी मतमोजणीचे निकाल स्क्रीन वरती पाहता येतील अशा ठिकाणी आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार बाहेर उभारण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी केंद्रातील सर्वसाधारण नियंत्रण, नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापन, केंद्रातील टेबल मांडणी, दिशादर्शक व सूचनांचे फलक लावणे व मतमोजणी केंद्र परिपूर्ण स्वरूपात तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सारख्या व्यवस्था पाहणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास बंदी असणार आहे. इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आपले मोबाईल कम्यूनिकेशन कक्षात किंवा व्यवस्था केलेल्या इतर ठिकाणी ठेवावे लागणार आहेत. तसेच माध्यम प्रतिनिधींनाही आतमध्ये जाताना मोबाईल माध्यम कक्षात ठेवावे लागणार आहेत. आयोगाच्या सूचनेनूसार माध्यम प्रतिनिधींनी फक्त व्हिडीओ कॅमेरा किंवा स्टील कॅमेरावरून सुविधा केलेल्या ठिकाणाहूनच छायाचित्रण किंवा छायाचित्र काढण्याची मुभा असणार आहे. यावेळी ट्रायपॉड वापरण्यास परवानगी नसणार आहे. एकावेळी विशिष्ट संख्येने माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षाकडून आतमध्ये सोडण्यात येणार आहेत.