no images were found
शहरातील 17 विनापरवाना,अनाधिकृत होर्डींग्जधारकांना नोटीसा
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दीतील विना परवाना, अनाधिकृत 17 होर्डींगधारकांना आज महापालिकेच्यावतीने तात्काळ होर्डीग्ज् काढणेबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार व मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार शहरातील होर्डींग्जधारकांना सदरची होर्डिंग्ज विनापरवाना असलेने ते तात्काळ काढून घेणेबाबत कळविले आहे. सदरची होर्डींग्ज मुदतीत काढली नाहीत तर आपणांवर विनापरवाना, अनाधिकृत जाहिरात केलेबद्दल आपणांवर कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
महापालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरामध्ये मान्सुन पुर्व करण्यात येणाऱ्या उपाय योजनेच्या अनुषंगाने व घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंग्जची तपासणी व अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले होते. त्याप्रमाणे शहरांतर्गत लावणेत आलेल्या जाहिरात होर्डिंग सुरक्षेबाबत उपायुक्त साधना पाटील यांनी होर्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी व होर्डिंगधारक यांच्या समवेत महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये झाले चर्चेनुसार आज हॉकी स्टेडीयम येथील दोन होर्डींग्ज, शाहू टोल नाका येथील एक होर्डींग, शाहू टोल नाका उड्डाण पूल पश्चिम बाजू येथील पाच होर्डींग्ज, जोतिबा हॉटेल कॉर्नर मार्केटयार्ड रोड येथील एक होर्डींग, रूईकर कॉलनी लिशा हॉटेल जवळील एक होर्डींग, दसरा चौक येथील साधना हॉटेल जवळील दोन होर्डींग्ज, कसबा बावडा भारत पेट्रोल पंप येथील एक होर्डींग, कसबा बावडा शिये रोड हॉटेल गोल्डन कॉईन येथील एक होर्डींग, श्री मंगल कार्यालय येथील एक होर्डींग, हॉटेल रेणुका येथील एक होर्डींग, इंडीयन ऑईल पेट्रोल पंप येथील एक होर्डींग धारकांना नोटीसा लागू करण्यात आल्या. महापालिकेच्या इस्टेट विभागाने या सर्व परिसरातील 17 विनापरवाना, अनाधिकृत होर्डींग्जधारकांना या नोटीसा लागू केल्या आहेत. तसेच मार्केटयार्ड वाळू अड्डा येथील एक होर्डींग व मार्केटयार्ड रोड वरील राजमुद्रा मटका मिसळ यांचे एक होर्डींग आज निष्काशित करुन ते काढून टाकले आहेत. सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे व इस्टेट विभागातील कर्मचा-यांनी केली.