
no images were found
गुजरातमधून येणारी ‘स्पेशल बर्फी‘ ठरू शकते घातक
मुंबई : आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बनावट खवा येत असून तो ‘स्पेशल बर्फी’ म्हणून मिठाई विक्रेत्यांना सहज उपलब्ध होत आहे. हा खवा शहरात तयार होणाऱ्या खव्याच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीत मिळत असल्याने मिठाई विक्रेत्यांनी हाच खवा मिठाई विक्रीसाठी सर्रास वापरणे सुरू केले आहे.ही ‘स्पेशल बर्फी’ आरोग्याला घातक ठरू शकते.
मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याचा वापर केला जातो. मात्र, या खव्याची उपलब्धता उत्पादनाच्या तुलनेत कमी असते. त्याला पर्याय म्हणून मिठाई विक्रेत्यांनी नामी क्लृप्ती शोधन काढली आहे. गुजरातमधील अहमदाबाद परिसरात तयार होणाऱ्या खव्याचा वापर सुरू केला आहे. त्यास मिठाई दुकानदारांच्या सांकेतिक भाषेत ‘स्पेशल बर्फी’ म्हणून संबोधले जाते. गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या या ‘स्पेशल बर्फी’वर बंदी आहे. काही उत्पादकांनी महाराष्ट्रालगत याचे कारखाने सुरू केले आहेत.
राज्यात सहज पोचणाऱ्या या खवा वितरणाचे मोठ्या प्रमाणात जाळे सक्रीय झाले आहे. ही स्पेशल बर्फी खासगी ट्रॅव्हलद्वारे बसेसमधून आणली जाते. सकाळी दाखल होणाऱ्या या गाड्या शहराच्या विविध भागात येतात. तेथून मिठाई विक्रेते आपापल्या गाड्यांमधून खवा घेऊन येतात. रोज सुमारे पाचशे रुपये किलो दराने ‘स्पेशल बर्फी’ नाशिकमध्ये उपलब्ध होत आहे.
या बर्फीच्या उत्पादकांकडे थेट केंद्र सरकारचा परवाना असतो. त्यामुळे त्याच्या दर्जाची गुणवत्ता महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये राज्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) तपासली जात नाही. त्यामुळेच या ‘स्पेशल बर्फी’ची बिनबोभाट विक्री केली जात आहे.
‘स्पेशल बर्फी’ म्हणून ओळखला जाणारा खवा दूध वापडर व व्हेजिटेबल ऑइल यांच्या मिश्रणातून तयार केला जातो.
शहरातील मिठाई विक्रेत्यांना हा खवा मिळाल्यानंतर त्यात इसेन्स टाकून आकार देत मिठाई बनविली जाते. बनावट खव्यापासून बनविलेली मिठाई खाल्ल्याने पोटाचे विकार होतात. अपचन, जुलाब, वांत्या डोकेदुखी असा आजारही होऊ शकतो. – बनावट खव्याच्या निर्मितीमध्ये रसायनांचाही वापर केला जातो. गरिकांनी मान्यताप्राप्त दुकानातूनच मिठाईची खरेदी करावी.