no images were found
मतदार जनजागृतीसाठी धावपटू डॉ.झुंजार माने यांची शाहूवाडी ते कोल्हापूर 50 कि.मी. दौड: अमोल येडगे
कोल्हापूर : नामांकित धावपटू शाहुवाडी तालुक्यातील मतदार डॉ.झुंजार माने यांनी मतदार जनजागृतीसाठी 50 किलोमीटर अंतराची दौड पूर्ण केली आहे. श्री. माने यांच्या प्रमाणेच अनेक मतदारांच्या व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी 7 मे रोजी मतदान करावे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील 100 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला राज्यासह देशात अग्रेसर बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी येत्या 7 मे रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये 70.88 टक्के मतदान झाले होते. मागील वेळच्या तुलनेने यावेळच्या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनामार्फत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदासंघात रन फॉर वोट, मानवी साखळी आदी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील मतदार देखील अनोखे उपक्रम राबवून मतदार जनजागृतीचा प्रयत्न करत आहेत.
आज दिनांक 4 मे रोजी शाहुवाडी येथील डॉक्टर झुंजार माने यांनी रात्री अडीच वाजता शाहूवाडी येथून त्यांची दौड सुरु केली व सकाळी आठ वाजता पोलीस ग्राउंड कोल्हापूर येथे त्यांची 50 कि. मी. अंतराची दौड पूर्ण झाली. त्यांच्या या दौड दरम्यान अमोल यादव यांनी 38 कि.मी. तर वाघबीळ ते कोल्हापूर यादरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे, चेतन चव्हाण व दिलीप जाधव यांनी 17 कि.मी. अंतराची दौड पूर्ण करुन मतदार जनजागृती केली.
या दौडच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारे यांनी सहभाग घेतला. या दौडची सांगता पोलीस परेड ग्राउंड, कोल्हापूर येथून झाली.
दौडच्या सांगता कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.येडगे म्हणाले, मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदारांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आतच सर्व मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे 100 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे थंड पाणी असेल. तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची सोय करण्यात आली आहे. वयस्कर व आजारी मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या व बेंचची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले