no images were found
शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
• शेतकऱ्यांना मशागत व पेरणीपूर्व मार्गदर्शन करा
• शेती उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करा
• जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सहकार्य करा
कोल्हापूर : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा, यासाठी वेळोवेळी निविष्ठांची तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.अशोक किसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, कृषी विकास अधिकारी अभय कुमार चव्हाण, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कृषी उपसंचालक आनंदा जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी अभिजीत गडदे, विनायक देशमुख, तंत्र अधिकारी अतुल जाधव व स्नेहल शेटे तसेच तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. ऊस, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग व कडधान्य पिकांसाठी खरीप हंगामात पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतू पाऊस कमी झाला तरीही उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. सन 2024 -25 मध्ये पीक कर्ज वाटपाचा लक्षांक 3858 कोटी असून हा लक्षांक वेळेत पूर्ण करा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देवून शासकीय योजनांचा लाभ, विमा सुरक्षा मिळवून द्या. तसेच पीक कर्ज मुदतीत वितरीत करा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसह शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम व कर्जवाटप मुदतीत करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना मशागत व पेरणी पूर्व मार्गदर्शन करा. क्षारपड जमिनीत सुधारणा होण्यासाठी तसेच या जमिनीची उपयुक्तता वाढवण्यासाठी उपाययोजनांवर भर द्या. जिल्ह्यातील रेशीम उत्पादकता वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केल्या.
शेतकऱ्यांच्या गटामार्फत गांडूळ खत व सेंद्रीय खत निर्मीती प्रकल्प उभारणी तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व शेतकरी गटांना मदत व प्रोत्साहन द्यावे. जिल्ह्यातील बी – बियाणे व कीटकनाशके आदी निविष्ठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करा. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या स्पर्धा घेवून शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत. तसेच सर्वाधिक उत्पादन घेत असलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्या शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा अन्य शेतकऱ्यांना उपयोग करुन द्या. प्रती एकरी सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कर देवून उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रोत्साहन द्या. जिल्ह्यात नॅनो युरियाचा वापर अत्यल्प असून याच्या वापराबाबत अधिक जनजागृती करुन किमान 25 टक्के वापर करुन देशात अग्रक्रमी राहण्यासाठी नियोजन करा, असे जिल्हाधिकारी श्री. येडगे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देवून उत्पादकतेत वाढ होण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी. तसेच खरीप हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी संचालक श्री. बिराजदार यांनी केले.
राज्य शासनाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख व कृषी पर्यवेक्षक जयवंत वागवेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करवीर तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांनी केले. आभार आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी मानले.