
no images were found
‘घरंदाज सावली : डॉ. उषा इथापे : कार्य आणि आठवणी’ ग्रंथावर बुधवारी परिसंवाद
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलसचिव डॉ. उषा इथापे यांच्या कार्य कर्तृत्वाच्या आठवणींचा पट उलगडणार्या ‘घरंदाज सावली : डॉ. उषा इथापे कार्य आणि आठवणी’ या प्रा. डॉ. रणधीर शिंदे संपादित ग्रंथावर परिसंवाद श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि डॉ. अप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. उद्या दि. १० एप्रिल, २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता हा कार्यक्रम मानव्यशास्त्र सभागृहात आयोजित केला आहे. डॉ. उषा इथापे यांचा व कोल्हापुरचा अतूट संबंध आहे. डॉ. इथापे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीच्या काळात कुलसचिव म्हणून आपल्या खंबीर नेतृत्वगुणाने ठसा उमटवला. आपल्या प्रदीर्घ अशा कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले. प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद राखला. डॉ. इथापे यांच्या मार्गदर्शन व पाठबळामुळे अनेक विद्यार्थी घडले आणि यशस्वी झाले. पण काळाच्या ओघात विसर पडलेल्या डॉ. उषा इथापे यांच्या याच कार्याच्या आठवणी या ग्रंथात डॉ. शिंदे यांनी संपादित केल्या आहेत. यामध्ये डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एस. एन. पठाण, राजन गवस, शालिनीताई पाटील, माया पंडित, किसनराव कुराडे, निनाद शहा, कृष्णा इंगोले यांचे डॉ. इथापे यांच्याविषयीचे आठवणपर कृतज्ञ लेख आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, प्राचार्य किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे यांच्या उपस्थितीत व कुलगुरू प्रा.डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल. तरी सर्व माजी विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील व संयोजक डॉ. सी. टी. पवार यांनी केले आहे.