no images were found
सोनी सबवरील लोकप्रिय कलाकार देत आहेत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
गुढी पाडव्याच्या मंगलमय पर्वाचा आनंद साजरा करत आपण नववर्षाचे स्वागत करत आहोत. संपूर्ण सृष्टी आणि आपल्या आसपासचे वातावरण देखील नववर्षाच्या चाहुलीने आल्हादक झाले आहे. या पवित्र दिनाशी निगडीत आपल्या आठवणी आणि आपण जपत असलेल्या परंपरा याविषयी सांगत आहेत आपले लाडके टेलिव्हिजन कलाकार
सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेत राजेश वागलेची भूमिका साकारत असलेला सुमित राघवन म्हणतो,गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात, मराठी पंचांगाचा पहिला दिवस. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि श्रीखंड-पुरीचा खासा बेत असतो. आपल्यासाठी या सणांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. हे सण आनंद पसरवतात. मी जेथे राहतो, तेथे बहुतांशी लोक मराठी आहेत, त्यामुळे वातावरण एकदम उत्साहाने सळसळणारे असते. या दिवशी पारंपरिक मिरवणुकी निघतात, ढोल-ताशाचा गजर होतो ज्यासाठी लोक एकत्र येतात व सणाचा आनंद साजरा करतात. माझ्याकडून सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेत राधिका वागलेची भूमिका करत असलेली भारती आचरेकर म्हणते, आमच्या लहानपणी, आम्ही खूप उत्साहाने गुढी पाडवा साजरा करायचो. आमच्यासाठी या दिवसाचे विलक्षण महत्त्व आहे तो अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. मी लहान होते, तेव्हा माझी आजी या दिवशी कडुलिंबाची चटणी बनवत असे आणि गुढी पाडव्याच्या दिवशी ही अत्यंत कडू पण पौष्टिक चटणी खाल्ली तर वर्षभर आरोग्य चांगले राहते असे ती म्हणायची. आमच्या घरी पुरणपोळीचा बेत असायचा आणि आम्ही सगळे एकत्र होऊन मेजवानीचा आनंद घ्यायचो.
सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेत सखीची भूमिका करत असलेली चिन्मयी साळवी म्हणते, गुढी पाडवा अत्यंत मंगल पर्व आहे, ज्या दिवशी सगळे कुटुंबीय एकत्र होतात, आपल्या घरी सुंदर गुढी उभारतात आणि गुढीची पूजा करतात. गुढी नकारात्मक ऊर्जेचा प्रतिबंध करून आपल्या जीवनात समृद्धी घेऊन येते असे म्हणतात. या पवित्र दिनी आमरस पुरी आणि श्रीखंडाचे जेवण हा माझा आवडता भाग आहे. गुढी सुशोभित करून आणि कडूलिंबाची पाने पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान करून (ज्याला शुद्धीकरण म्हणतात) या दिवसाची सुरुवात होते. मी कॉलेजमध्ये असताना या दिवशी आवर्जून नऊवारी साडी नेसून मिरवणुकीत सामील होत असे तसेच गुढी पाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात कथक नृत्य सादर करत असे. गुढी पाडव्याच्या माझ्या आठवणी म्हणजे कुटुंबियांसोबत मजेत घालवलेले क्षण, यथेच्छ भोजन आणि नववर्षाचे स्वागत! तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत कुसुम अवस्थीची भूमिका साकारत असलेली सोनाली नाईक म्हणते, मला गुढी पाडवा हा सण फारच आवडतो कारण या दिवशी माझे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सुंदर गुढी उभारते आणि सर्वांच्या यशासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी घरी रांधलेले सुग्रास जेवण सणाची लज्जत वाढवते. पारंपरिक मराठी पोशाख परिधान करून आम्ही या दिवशी नववर्षाचे स्वागत करतो.
सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत सृष्टी वर्माची भूमिका करणारी उत्कर्षा नाईक म्हणते, आम्हा मराठी लोकांसाठी गुढी पाडवा अत्यंत महत्त्वाचा सण आहे कारण या दिवशी नववर्षाची पवित्र सुरुवात होते. आम्ही हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. या दिवशी उभारलेली गुढी ही नव्या आरंभाचे आणि लोकांच्या आनंदाचे प्रतीक आहे. सध्या मी उंबरगाव येथे ‘वंशज’ मालिकेचे शूटिंग करण्यात व्यग्र असले, तरी हा सण साजरा करण्यासाठी मी नक्कीच वेळ काढेन. गुढी पाडव्याचा आनंद आपल्या माणसांसोबत साजरा करण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मला एक दिवस मोकळा मिळावा अशी आशा आहे. माझ्या सर्व प्रिय प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण नेहमी सर्वांसाठी सुयश आणि आनंद चिंततो. त्याप्रमाणे गुढी पाडव्याच्या औचित्याने मी येणारे वर्ष प्रत्येकासाठी सुख-समृद्धी आणि यश घेऊन येवो अशी कामना करते.