no images were found
ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवन गौरव पुरस्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रख्यात ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते मोहन जोशी यांना धनदायी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. करवीर पिठाचे जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या बुधवारी १० एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड.शिवराम जोशी (मुडशिंगीकर) आणि उपाध्यक्ष रामदास रेवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
खाजगी सावकारीकडून मध्यमवर्गीयांची आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच त्यांना त्वरित आणि सुलभ पद्धतीने आर्थिक मदत करता यावी, चार लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि गेली २५ वर्षे या संस्थेची घोडदौड या उद्देशाने सुरू आहे. सन २००० पासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ सभासद व मान्यवरांचा सत्कार होणार असून मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर ‘ती’ या सुश्राव्य मराठी गीतांची मैफिल असे भरगच्च कार्यक्रम यावेळी होणार आहेत.
पत्रकार परिषदेस संचालक लता कदम, व्यवस्थापक संजय जमदग्नी उपस्थित होते.