no images were found
कलाकार सांगत आहेत आपल्या मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनविषयी
आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते आणि घराघरात आप्तस्वकीय आणि मित्रमंडळींची वर्दळ वाढते. मकर संक्रांत घेऊन येते नवीनता, कृतज्ञता आणि सहवासाचा आनंद. शुभारंभ, आशा आणि सकारात्मकतेचा आनंद घेऊन येणाऱ्या या कापणीच्या सणाविषयी सोनी सबवरील कलाकार श्रेनु परीख, करुणा पांडे, नितीन बाबू, दीक्षा जोशी, नेहा एस. के. मेहता, ऋषी सक्सेना आणि सुंबुल तौकीर खान सांगत आहेत की त्यांच्या लेखी या सणाची लक्षणीयता काय आहे. आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना आशा आणि ऐक्याच्या या उत्सवाचा आनंद कसा छोट्या छोट्या गोष्टींत सामावेलेला आहे, हे आपल्या शब्दांत सांगत आहेत.
‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत देवी पार्वतीची भूमिका करणारी श्रेनु परीख म्हणते, “मकर संक्रांती हा पहिल्यापासून माझा आवडता सण आहे. माझ्या शहरात वडोदरा येथे त्याला उत्तरायण म्हणतात. येथे 14 आणि 15 जानेवारी हे दोन्ही दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पतंग उडवण्यासाठी राखलेले असतात. थंडीत सुखावह वाटणारे ऊन अंगावर घेत, गाजर, बोरं, आवळे, चिक्की, उंधियुचा आस्वाद घेत घेत पतंग उडवण्याचा आनंद घ्यायचा! मला पतंग उडवायला खूप आवडते. आणि आजही या सणाचा आनंद घेण्यासाठी माझे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणी आवर्जून संक्रांतीत बडोद्यात येतात. माझा विवाह मराठी कुटुंबात झाल्यामुळे या सणाची आणखी एक सुंदर बाजू मला समजली. गेले वर्ष माझ्यासाठी खास होते, कारण त्यावेळी लग्न झाल्यानंतरची माझी पहिली संक्रांत होती. आम्ही घरी हळदीकुंकू ठेवले होते. सुवासिनी सुंदर काळ्या रंगाच्या साडीत, हलव्याचे दागिने घालून आमच्याकडे हळदीकुंकवाला आल्या होत्या आणि ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ म्हणत सगळ्यांनी एकमेकींना तिळगूळ दिला. जीवन कितीही धकाधकीचे असले तरी या परंपरा जिवंत ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत एसीपी संजय भोसलेची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “मला पहिल्यापासून मकरसंक्रांती हा सकारात्मकता आणि नूतनीकरणाचा सण वाटतो. लहान असताना या दिवशी लवकर उठून झटपट तयार होऊन आख्खा दिवस गच्चीत पतंग उडवण्यात घालवायचो. सोबत शेजारी-पाजारी आणि नातेवाईकांचा घोळका असायचा. खूप हास्य विनोद, खेळकर स्पर्धा आणि अर्थात तिळगूळ आणि चिक्कीचा आस्वाद! आता मी मुंबईतच राहात असल्यामुळे आणि मराठी मनोरंजन उद्योगात काम केल्यामुळे तिळगूळ हा माझ्यासाठी संक्रांतीच्या परंपरांचा अविभाज्य भाग बनला आहे. मला या गोष्टीचा अचंबा वाटतो की कसे आपले सण आपल्याला नकारात्मकता सोडून जीवनातील गोडवा टिपायला शिकवतात. आता माझ्या शूटिंगच्या व्यस्ततेत देखील ही परंपरा माझ्या पद्धतीने जिवंत ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. मी सेटवर सगळ्यांसाठी मिठाई आणतो आणि सणाचा आनंद अनुभवतो.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी दीक्षा जोशी म्हणते, “मी गुजरातची असल्यामुळे मकर संक्रांतीचे माझ्यासाठी खास महत्त्व आहे. माझ्यासाठी उत्तरायण हे केवळ एक दिवसाचे सेलिब्रेशन नसायचे. मित्र-मैत्रिणी, सणाचे खास पदार्थ, संगीत आणि पतंग उडवण्याचा हा मोठा उत्सव असायचा. उंधियु-जलेबी खाण्यापासून ते गच्चीतून ‘कायपो छे’ म्हणून आरोळी ठोकण्यातील मजा काही औरच! आता ‘पुष्पा इम्पॉसिबल’ परिवारासोबत काम करत असताना हा सण साजरा करताना मी जुन्या आठवणींत रमते. पण तुम्ही कुठेही असलात तरी परंपरा जिवंत राहतात हे पाहताना धन्यता वाटते.”
‘इत्ती सी खुशी’ मालिकेत हेतलची भूमिका करणारी नेहा एस. के. मेहता म्हणते, “मकरसंक्रांतीचा सण हा सणवार लोकांना कसे एकत्र घेऊन येतात याचा प्रत्यय देतो. आपल्या नातेवाईकांसोबत पतंग उडवण्याच्या, मिठाईची देवाणघेवाण करण्याच्या आणि छोट्या छोट्या आनंदांचा आस्वाद घेण्याच्या सुंदर आठवणी माझ्याजवळ आहेत. गोड बोलावे, दयाळू असावे आणि साकारात्मकतेने पुढे जावे हा या सणाचा संदेश मला फार आवडतो. सेटवरील लहान मुले आणि मालिकेच्या एकंदर टीमसोबत हा सण साजरा करताना आनंदात भर पडते आणि हा सण अधिकच आपलासा आणि विशेष वाटतो.”