no images were found
18 व 19 एप्रिल रोजी मतदार जनजागृतीबाबत सीईओ कार्तिकेयन यांच्या मुख्याद्यापकांना सूचना
कोल्हापूर, : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी प्रत्येक शाळेतील इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 वी चे विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र पाठविणार आहेत. तसेच शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे प्रशासक कार्तिकेयन एस यांनी केले आहे.
18 एप्रिल रोजी पालकांना देण्यात येणाऱ्या पत्रात, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि एकाच वेळी सर्व भारतीय मतदार झाले. निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार वापरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान आपल्या प्रभागात दिनांक 7 मे 2024 रोजी होत आहे. माझ्या उज्वल भविष्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करावेच, असा माझा हट्ट आहे. आपल्या कुटुंबातील आणि गल्लीतील मतदारांना मतदानांसाठी सोबत घेऊन जाल तर मला खूप आनंद होईल. आपण माझा हट्ट नक्की पूर्ण कराल, याची मला खात्री आहे या आशयाचे पत्र विद्यार्थी पालकांना लिहीणार आहेत.
19 एप्रिल रोजी प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचारी तसेच ग्रामीण स्तरावर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कृषी सहायक, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. यामध्ये मतदान जनजागृतीचे बॅनर /फलक, मतदानाच्या अनुषंगाने घोषवाक्य याव्दारे मतदार जनजागृती करण्यात येणार आहे.