no images were found
महापालिकेच्यावतीने उन्नाड व भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुरु
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील उनाड व भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आजपासून प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार सुरु करण्यात आले आहे. यामध्ये 47 उनाड व भटक्या कुत्र्यांचे कसबा बावडा परिसरात लसीकरण करण्यात आले आहे. हि मोहिम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपआयुक्त पंडीत पाटील व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहिम पुर्ण राबविण्यात येत आहे.
उनाड व भटक्या कुत्र्यांबाबत पशु जन्म प्रतिबंध (उनाड व भटक्या कुत्री) हा कायदा आहे. या कायद्यानुसार उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेले आहेत. तसेच या कायद्यानुसार उनाड व भटक्या कुत्र्यांना मारणे अथवा इतरत्र नेऊन सोडणे यास पुर्णपणे मनाई आहे. या कायद्याप्रमाणे महानगरपालिकेचे उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे कामकाज सुरु आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शहरातील 7500 पेक्षा जास्त उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आजअखेर करण्यात आले आहे. कायद्यातील तरतूदीनुसार शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रियेनंतर योग्य ती देखभाल व पोषण करुन शस्त्रक्रियेची जखम बरी झालेनंतर पकडलेल्या कुत्र्यांना त्यांच्या मुळ जागी सोडण्यात येते.
उनाड व भटक्या कुत्र्यांना रेबीज हा प्रामुख्याने होणार आजार आहे. यामध्ये कुत्रा पिसाळून मनुष्य व इतर प्राण्यांचा चावा घेतो. त्यामुळे रेबीज हा रोग त्यांना देखील होऊ शकतो. याकरीता शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस महापालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत कुत्री पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळया तयार केल्या आहेत. या जाळयाद्वारे त्यांना पकडून जागेवरच ही लस देण्यात येते. त्यांनतर लस दिलेल्या कुत्र्याला ओळख म्हणून निळा रंगाची विशीष्ट खूण केली जाते. लस दिल्यानंतर त्याला लगेच सोडले जाते. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत रेबीज प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये पुशवैदयकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, पुशधन विकास अधिकारी डॉ.किरण उनवणे, आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, सहा. आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी उपस्थित होते.
रेबिज प्रतिबंधात्मक लस छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) व सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे उपलब्ध असून सदर लसीचा डोस विहित वेळापत्रकानुसार (0, 3, 7, 14, 28) असा आहे. भटक्या कुत्र्यांबाबत नागरीकांना तक्रार करावयाची असल्यास कृपया सहा.आरोग्य निरिक्षक, कोल्हापूर महानगरपालिका (9561814474) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.