no images were found
क्षयरोग विभागास अत्याधुनिक ट्रुनॅट मशीन प्रदान
कोल्हापूर : कोल्हापूर ग्रामीणसाठी राज्यस्तरावरुन नवीन सहा ट्रुनॅट मशीन प्राप्त झाली असून या मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी हॉल येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, पी. एस.एम. विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कोतनीस, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.ए.पटेल तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ट्रुनॅट मशीन मशीन क्षयरोग विभागास प्रदान करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयामध्येही मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ट्रुनॅट मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, या मशीनचा वापर करुन कमी वेळेत क्षयरोगाचे निदान करुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये टिबी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबवावे. यावेळी त्यांनी क्षयरुग्ण दत्तक घेऊन स्वतः निक्षय मित्र बनणार असल्याचे जाहीर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, संस्था यांनी निक्षय मित्र बनून क्षयरुग्ण दत्तक घ्यावेत, असे आवाहनही यावेळी केले.
हे मशीन कोल्हापूर मधील सर्व तालुक्यात मुख्य आरोग्य संस्थेत लावण्यात येणार आहे. खासगी संस्थेत ही तापसणी दोन ते अडीच हजारात होते तथापि शासकीय संस्थेत ही तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येते. तसेच या तपासणीतुन प्रथम टप्प्यातील टीबी निदानाबरोबरच पुढील टप्प्यातील एम.डी. आर. निदान त्याच वेळी करण्यात येते. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी ट्रुनॅट मशीन हे दोन तासांमध्ये क्षयरोगाचे निदान करते, यामुळे रुग्णास लवकर उपचारावर आणून बरे करता येते. त्यामुळे त्या रुग्णापासून होणारा पुढील प्रसार थांबतो, अशी माहिती दिली. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री. संभाजी मोरे यांनी ट्रुनॅट मशीनच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती दिली.