no images were found
राज्यपालांच्या हस्ते रत्न आभूषण निर्यात पुरस्कार प्रदान
मुंबई : देशाच्या निर्यातीत मोठे योगदान असणारा रत्न आभूषण उद्योग दुबई आणि जयपूर येथे रत्न आभूषण प्रदर्शनाचे आयोजन करीत असतो. त्याच धर्तीवर मुंबई येथे रत्न आभूषण उद्योगाने एकीकृत मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करावा व त्यामध्ये रत्न व आभूषणाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन परेड, फूड फेस्टिवल व फिल्म फेस्टिवलचा देखील समावेश करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल बैस यांच्या हस्ते तसेच रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 30) रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे देण्यात येणारे 50 वे रत्न व आभूषण निर्यात पुरस्कार हॉटेल ट्रायडेंट मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
जागतिक व्यापारात भारत अग्रक्रमांकाकडे वाटचाल करीत असताना रत्न आभूषण क्षेत्राने देशातील कारागीरांचे पारंपरिक कौशल्य टिकवून ठेवावे. पारंपरिक सुवर्ण कारागीर तसेच हिऱ्यांना पैलू पडणाऱ्या कलाकारांचे हित रक्षण करावे व या क्षेत्रातील अखेरच्या व्यक्तीची काळजी घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण रत्न व आभूषण परिषदेला राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांसोबत काम करण्याचे आवाहन करतो असे राज्यपालांनी सांगितले. या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक प्रशिक्षणार्थी पदे निर्माण करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
रत्न व आभूषण क्षेत्राला महिलांकडून नेहमीच आश्रय मिळाला आहे असे नमूद करून आता महिलांना या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे आवाहन राज्यपालांनी केले.
रत्न आभूषण निर्यात उद्योग 100 अब्ज निर्यातीचे लक्ष गाठेल, उद्योगपती मुकेश अंबानी यांना विश्वास
भारतात फार मोठ्या प्रमाणात सोने सापडत नसले तरी देखील आपल्या उद्योजकांनी कल्पनाशक्ती व उद्यम शीलतेच्या जोरावर रत्न आभूषण उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवला हे कौतुकास्पद आहे असे सांगून रत्न आभूषण क्षेत्र आगामी काळात 100 अब्ज डॉलर इतके निर्यात उद्दिष्ट गाठेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वसमावेशक व विकसित भारताच्या निर्मितीमध्ये रत्न आभूषण निर्यात क्षेत्र मोठी भूमिका बजावेल असे अंबानी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध हिरे व्यावसायिक व अध्यक्ष, रोझी ब्लू रसेल मेहता यांना रत्न आणि आभूषण निर्यात परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते रत्न आणि आभूषण क्षेत्रतील सर्वाधिक उलाढाल, उत्कृष्ट उद्योग कामगिरी, फॅशन आभूषण, सामाजिक भान असलेला उद्योग आदी संस्थांना रत्न आभूषण निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भारत रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भंसाळी, पुरस्कार समितीचे निमंत्रक मिलन चोकसी, भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.