
no images were found
प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तव यांचे निधन झाले. कॉमेडिचा बादशहा अशी त्याची मनोरंजन क्षेत्रात ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले. त्यांनी १९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. राजू श्रीवास्तव यांनी सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमात अभिनय केल्यानंतर त्यांनी आणखी काही सिनेमे करत कॉमेडीमध्ये क्षेत्रात प्रवेश केला. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून राजू श्रीवास्तव यांना प्रसिद्धी मिळाली. ‘बिग बॉस ३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.
जिममध्ये ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. गेल्या ४० दिवसांपासून ते इस्पितळात दाखल होते. राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. काल राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते. मात्र आज इस्पितळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.