no images were found
विशेष मोहीम घेऊन सर्व कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर : पशु जन्म प्रतिबंध कायद्यानुसार शहरातील सर्व उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस लवकरात लवकर देण्याची विशेष मोहिम हाती घ्यावी अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात आज उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरणाबाबत आढावा बैठक आयोजीत केली होती. यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, अन्न औषध प्रशासनाचे सहा.आयुक्त तुषार शिगाडे, खाडे, अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन जाधव उपस्थित होते.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी भटक्या कुत्र्यांना मिळणारे खाद्यपदार्थ प्रामुख्याने मटण, चिकन वेस्ट व खाद्यपदार्थ मधील चिकन 65 वेस्ट खाण्यास मिळत असलेबाबत वारंवार नागरीकांच्या तक्रारी येत आहेत. अशा मटन, चिकन, मासे व चायनीज पदार्थ विकणारे सर्व विक्रेते मध्ये उघडयावर शिल्लक मांस व वेस्टेज न टाकणेबाबत प्रथम जनजागृती करावी. त्यांनी साठणारे सर्व वेस्टेज मटेरियल आजूबाजूला न टाकता ते डस्टबीनमध्ये साठवून ठेवून महानगरपालिकेचे कचरा गाडीमध्येच टाकणेबाबत सूचना दयावी. आरोग्य विभागाने वेस्टेज जमा करण्यासाठी रात्री स्वतंत्र वाहण उपलब्ध करून द्यावे. जर कोणी विक्रेता सूचना देऊनही रस्त्यावर, नाल्यामध्ये खुल्या जागेत अशा प्रकारचा कचरा टाकत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. आवश्यकता वाटल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. यासाठी कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट विभाग, आरोग्य निरीक्षक व अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी अशा सूचना अन्न व औषध अधिकारी व अतिक्रमण अधिकारी सचिन जाधव यांना दिल्या.