no images were found
‘ध्रुव तारा’ मालिकेत दोन अगदी विरुद्ध व्यक्तिरेखा साकारून अनुज सचदेवाने सिद्ध केली आपली क्षमता
सोनी सबवरील ध्रुव तारा – समय सदी से परे मालिकेत आलेल्या लीप नंतर अनुज सचदेवा या अभिनेत्याने या मालिकेत देवगडचा राजकुमार मान सिंहच्या रूपात एक लक्षवेधी एंट्री घेतली आहे आणि ही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारून त्याने आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली आहे. अलीकडेच कपाली नामक एक नवीन व्यक्तिरेखा मालिकेत दाखल झाली आहे, ज्यामुळे मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. कपालीची व्यक्तिरेखा साकारणारा स्वतः अनुज सचदेवाच आहे हे समजल्यावर प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. मान सिंह कपालीचा वेश धारण करून आपला भाऊ सूर्यप्रताप (करण व्ही. ग्रोव्हर) यास ठार मारून देवगडचे राज्य बळकावण्याच्या प्रयत्नात आहे.
अनुज सचदेवाने एकी कडे मानसिंह तर दुसरीकडे कपालीची भूमिका समर्थपणे साकारून आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. एकावेळी दोन अगदी वेगळी व्यक्तिमत्वं साकारणे ही अवघड गोष्ट आहे. पण अनुजने सहजपणे ते साध्य केले. अलीकडेच त्याच्याशी झालेल्या संभाषणात, ही दोन्ही पात्रं जिवंत करण्यासाठी आपण कशी तयारी केली आणि कोणत्या बारकाव्यांवर काम केले याविषयी अनुजने सांगितले.
ही वेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्यासाठीची तयारी आणि त्यावेळी आलेल्या समस्या याबद्दल बोलताना अनुज सचदेवा म्हणाला, “माझ्यासाठी सगळ्यात मोठे आव्हान कपालीचा वेश धारण करण्याचे होते. तो वेश धारण करायला मला कमीत कमी 2 तास लागायचे. कपालीचा लुक आणि मेकअप अगदी वेगळ्या प्रकारचा आहे. कपालीची चाल एखाद्या स्त्री सारखी आहे. त्यावर मला लक्ष द्यावे लागले. कपालीसाठी तयारी करायला मला जास्त वेळ नव्हता आणि मान सिंहच्या पात्रासाठी मी माझा नैसर्गिक आवाज वापरत होतो, त्यामुळे कपालीच्या आवाजात वेगळेपण आणणे गरजेचे होते. मी वरच्या पट्टीतला आवाज लावला. असा आवाज जो तुमच्या कानात रुंजी घालत राहतो. त्यासाठी मला थोडा प्रयत्न करावा लागला.”
दोन पात्रांमधील वेगळेपणा आणि आलटून पालटून ती पात्रे निभावण्याच्या आव्हानाबद्दल बोलताना अनुज म्हणाला, “दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये फारच अंतर आहे. टेलिव्हिजनवर काम करताना आमच्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे जेव्हा मला एकाच दिवशी मान सिंह आणि कपाली या दोन्ही व्यक्तिरेखा साकारण्याची वेळ येई, तेव्हा एक अभिनेता म्हणून माझ्या लकबी, चाल, आवाज आणि लुक यातले अंतर दाखवणे माझ्यासाठी आव्हानात्मक होऊन बसे.”
कपाली ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी कशी स्वीकारली, याबाबत विचारले असता अनुज उत्तरला, “माझे चाहते, प्रॉडक्शन टीम आणि सेटवरच्या सर्वांनीच या व्यक्तिरेखेचे इतके कौतुक केले की, ते मला माझे संवाद पुन्हा पुन्हा बोलायला सांगत आणि त्याची नक्कलही करत असत. या भूमिकेत आव्हाने होती, पण माझे प्रयत्न प्रेक्षक आणि माझे सहकारी या सर्वांपर्यंत पोहोचले, त्यांना आवडले हे समाधान देणारे आहे.”
कपालीच्या भूमिकेत शिरण्यासाठी काय काय बदल करावे लागत याविषयी अनुज सांगतो, “ही प्रक्रिया फार लांबलचक आहे. साडी नेसण्याची मला सवय नाही, त्यामुळे टीमने मला मदत केली. या भूमिकेसाठी मला रोज दाढी करावी लागत होती. त्यानंतर सुरू व्हायचे प्रदीर्घ मेकअप सेशन आणि त्यानंतर आभूषणे परिधान करण्याचा कार्यक्रम! केसांचा विग घालणे हे आणखी एक आव्हान होते. ही प्रक्रिया खूप किचकट असली तरी पडद्यावर ही व्यक्तिरेखा जिवंत झालेली पाहून मला खूप समाधान वाटायचे. ज्या महिला साडी नेसतात आणि दररोज अशा तयार होऊन वावरतात त्यांचे मला कौतुक वाटते. ते काही सोपे काम नाही. हीच गोष्ट मी ताराची भूमिका करणाऱ्या रिया शर्माला देखील सांगितली. जर तुमच्या जीवनातील स्त्रीला तयार होण्यासाठी दोन तास लागत असतील तर कृपा करून त्यांना तेवढा वेळ द्या. सगळ्या महिलांना सलाम आहे!”
या भूमिकेविषयी बोलताना तो म्हणाला, “एक अभिनेता म्हणून स्वतःला आव्हान देणे आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या भूमिका करून बघणे महत्त्वाचे आहे. टीव्हीवरील अभिनेत्यांना अशा वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा सहजासहजी करायला मिळत नाहीत. मी ही भूमिका स्वीकारायचे ठरवले, याबद्दल मला अभिमान वाटतो. कपाली साकारण्यासाठी मी माझ्या जीव या भूमिकेत ओतला आहे. आणि मला वाटते की, मी या भूमिकेला न्याय दिला आहे.”