no images were found
सरपंच निवडीवरून दोन गटांत राडा; 40 जणांविरुध्द गुन्हा, 3 पोलीस जखमी
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे रात्री उशिरा ही घटना घडली. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एक गट आक्रमक झाला. त्यानंतर दुसऱ्या गटाकडूनही वादास सुरुवात झाली.
राज्यात 608 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा इथं ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यांसाठी निवडणूक झाली. यामध्ये दोन गटांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी औंढा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. सरपंचपदाच्या निवडीमध्ये गरड गटाचा उमेदवार विजयी झाला. यामध्ये रवंदळे गटाचे 5, तर गरड गटाचे 4 सदस्य विजयी झाले. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. सदस्यांचे बहुमत एका गटाकडं तर थेट निवडीतून सरपंच दुसऱ्या गटाचा झाल्याने घोषणाबाजीला सुरुवात झाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी गावात जाऊन मिरवणूक न काढण्याबाबत सूचना दिली. त्यानंतरही दोन्ही गटांनी मिरवणूक काढली. त्यातून दोन गट समोरासमोर आल्यानंतर चांगलाच राडा झाला. याप्रसंगी वाद मिटवणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की आणि दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
यामध्ये पोलिस कर्मचारी रवी इंगोले, वसीम पठाण, राजकुमार कुटे जखमी झाले. त्यानंतर वाढीव पोलिस कुमक मागविण्यात आली. या प्रकरणी 40 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंगळवारी पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.