no images were found
शिवाजी विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालकपदी डॉ. सागर डेळेकर यांची निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) संचालकपदी डॉ. सागर डेळेकर यांची म्हणून निवड झाली आहे. सदरचे कक्ष हे विद्यापीठाच्या एकूण अध्यापन,मूल्यमापन, संशोधन विस्तार आणि सल्लामसलत संधीची गुणवत्ता वाढीविण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्याअंतर्गत गुणवत्ता आणि सतत अपेक्षित बदल सुनिश्चित करून NIRF रँकिंग, ATAL रँकिंग, NAAC नामांकन इत्यांदीमध्ये सुधारणा करणे हा या कक्षाचा मुख्य उद्देश आहे. डॉ.डेळेकर यांच्याकडे या संबंधित क्षेत्रात बराच अनुभव आहे. सध्या प्रा.डेळेकर हे रसायनशास्त्र विभागात गेले २२ वर्षे प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत असून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत जसे की नोबेल विजेते प्रा. हॅरी क्रोटो यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेमध्ये पोस्ट डॉक्टरेटसाठी रमन फेलोशिप, इंडियन अकॅडमी ऑफ सायंन्स अंतर्गत समर रिसर्च फेलोशिप, महाराष्ट्र विज्ञान अकॅडमी तर्फे फेलो म्हणून निवड, युवा -शास्त्रज्ञ या योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी संशोधन निधी, इत्यादी. इनोव्हेशन व इनक्युबेशन या पार्श्वभूमीवर ते अशा अनेक उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी नेहमी सुसज्ज असतात.
या अनुषंगाने नुकतेच ते इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेस सेंटरच्या संचालकपदावरही रुजू झाले आहेत. त्याचबरोबर ते संस्थेच्या इनोव्हेशन सेलचे समन्वयक तसेच केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत इनोव्हेशन कौन्सिल राजदूत म्हणून देखील काम पाहत आहेत. याशिवाय, अमेरिका, युनाइटेड किंग्डम, तैवान, दक्षिण कोरिया इत्यादी देशांतील प्रमुख संस्थांसोबत त्यांचे सहकार्य आहे. आजपर्यंत प्रा. डेळेकर यांनी ऊर्जा, जैववैद्यकीय आणि पर्यावरणीय उपाय या क्षेत्रांमध्ये ११ भारतीय व जर्मन पेटंट दाखल केले आहेत. याशिवाय, त्यांनी १०२ हून अधिक संशोधन लेख प्रकाशित केले असून त्यांना ३६०० हून अधिक उद्धरण (Citations) प्राप्त झाले आहेत. सदर कक्षाअंतर्गत विद्यापीठच्या कार्यक्षमतेमध्ये गुणवत्ता आणि सतत सुधारणा सुनिश्चित केली जाईल अशी ग्वाही डॉ. डेळेकर यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के सर, आदरणीय प्र-कुलगुरू प्रा.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांनी डॉ. डेळेकर यांचे मनःपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.