Home शासकीय ऑलिंपिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार – हसन मुश्रीफ

ऑलिंपिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार – हसन मुश्रीफ

10 second read
0
0
31

no images were found

ऑलिंपिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार – हसन मुश्रीफ

 

इतिहास घडविण्याची आणि बदलण्याची ताकद कोल्हापूरच्या मातीत असून ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून स्वप्निल कुसाळेने हे सिद्ध करुन दाखवले आहे. भविष्यात स्वप्निल सुवर्णपदकाला निश्चितच गवसणी घालेल, असा विश्वास व्यक्त करुन स्वप्निल कुसाळे व तेजस्विनी सावंत यांनी पुढाकार घेवून कोल्हापुरात ऑलिंपिक दर्जाची शुटींग रेंज तयार करण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील. तसेच कांबळवाडीच्या विकास कामांसाठी 1 कोटींचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी उत्तम स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीसारख्या छोट्याशा, डोंगराळ गावात जन्मूनसुद्धा इयत्ता नववीत असतानाच स्वप्निलने नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळातच नवनाथ फडतरे यांच्यासारखे त्याच्या स्वप्नांना बळ आणि आकार देणारे सक्षम गुरु त्याला भेटले. ज्या पद्धतीने योग्य गुरु लाभल्यानंतर निशाणा अचूक लागतो त्याच पद्धतीने नवनाथ फडतरे यांनी स्वप्निललला त्याचे लक्ष सायकलिंगवरुन काढून नेमबाजीकडे केंद्रित करण्यास सांगितले आणि स्वप्निलने नेमबाजीत योग्य निशाणा साधला.

ऑलिंपिकवीर महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला तब्बल 72 वर्षानंतर तेही कोल्हापूरलाच ऑलिंपिक पदक मिळवून देण्याचा बहुमान स्वप्निल सुरेश कुसाळे यांनी मिळवून दिला. कोल्हापूर जिल्ह्यासह हा सबंध महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे स्वप्निलचे स्वप्न आहे. कांस्यपदक मिळवून सुद्धा तो या यशाने हुरळून न जाता सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील आहे, याबद्दल निश्चितच अभिमान वाटायला पाहिजे.  

भविष्यकाळात खेळ आणि खेळाडूंना संधी देण्यासाठी अत्याधुनिक स्टेडियम, क्रीडासंकुले निर्माण करुन त्यांना  आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा सोयी- सुविधा उपलब्ध झाल्यानंतर भारत जगभरात अग्रेसर राहिल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेती, सहकार, उद्योग, विद्यार्थी, खेळाडू, कलाकार, कारागिरांना प्रोत्साहन दिले. रुस्तुम ए हिंद पैलवान दादू चौगुले, महान भारत केसरी युवराज पाटील, नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्यासह अनेक रत्ने कोल्हापुरच्या मातीत घडली आहेत. प्रचंड जिद्द आणि कठोर परिश्रमातून स्वप्नीलने हे यश साध्य केले आहे. जागतिक कीर्तीचे स्वप्निलचे हे यश गौरवास्पद आहेच. त्याचबरोबर स्वप्निलच्या कुटुंबीयांनी त्याला दिलेली पाठबळसुद्धा कौतुकास्पद आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी केलेले प्रचंड काबाडकष्ट, केलेला त्याग या सर्वांची फलनिष्पत्ती हे ऑलिम्पिक पदक आहे,  अशा शब्दात त्याचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले,  कोल्हापूर नगरी ही छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आणि कार्याने पावन झाली आहे. इतिहास, संस्कृतिक, कला, क्रीडा, पर्यटन, व्यापार अशा अनेक क्षेत्रांमुळे कोल्हापूरची ओळख सर्वदूर आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू कोल्हापुरच्या मातीत घडल्यामुळे  कोल्हापूरची तुलना क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पंजाब, हरियाणा सारख्या राज्यांच्या कामगिरीशी केली तरी वावगे ठरणार नाही.

शाहू महाराज हे स्वतः निष्णात मल्ल होते. त्यांचे कुस्तीवर विलक्षण प्रेम होते. त्यांनी कुस्तीला राजाश्रय दिला व अनेक खेळांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे कोल्हापुरात कुस्ती बरोबरच फुटबॉल, नेमबाजी, स्विमिंग, बॅडमिंटन असे अनेक खेळ रुजले आणि वाढले आहेत. यामुळेच करवीर नगरी क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तम-ए-हिंद दादू चौगले, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांनी कोल्हापूरच्या कुस्तीचा झेंडा जगभर फडकवला. अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंधळकर, शैलजा साळुंखे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, वीरधवल खाडे, अनिकेत जाधव, निखिल कदम, स्वप्निल पाटील असे अर्जुन पुरस्कार विजेते याच मातीतले. येथील खेळाडूंच्या पराक्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापुरची छाप उमटली आहे. महाराष्ट्राला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचा कोल्हापुरातच सराव असायचा. त्यामुळे हे शहर जागतिक क्रीडा नकाशावर आले.

 स्वप्निल कुसाळे यांनी पॅरिस ऑलम्पिक मध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदक जिंकले आणि खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल 72 वर्षानंतर ऑलिंपिक पदक जिंकण्याचा मान महाराष्ट्राला मिळवून दिला. स्वप्निल कुसाळे यांचा कांबळवाडी ते पॅरिस हा प्रवास अत्यंत खडतर आहे. राधानगरी तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या कांबळवाडी सारख्या छोट्या गावातून येऊन ऑलम्पिक मध्ये पदक मिळवणे ही सामान्य बाब नाही. यामागे स्वप्निल यांचे कष्ट ,जिद्द ,चिकाटी, संयम कारणीभूत आहे.  आपल्या मुलांनी यूपीएससी एमपीएससी करावी जेईई नीट करावं असा आग्रह धरला जातो अशा काळात आपल्या मुलाची क्रीडा क्षेत्रातली आवड लक्षात घेऊन मुलाच्या करिअरसाठी  स्वतःच्या इच्छा आकांक्षा दूर करून प्रसंगी कर्ज काढून त्याला पैसा पुरवणारे कुसाळे कुटुंबीय हे आजच्या पालक वर्गासाठी आदर्शवत आहेत.स्वप्निल कुसाळे यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या प्रशिक्षिका अर्जुन पुरस्काराने सन्मानित दिपाली देशपांडे यांचेही योगदान मोलाचं आहे. स्वप्निल यांच्यासाठी हे कांस्यपदक स्वल्पविरामसारखे असून भविष्यात ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकावं आणि ते जिंकतीलच,असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमापूर्वी झेंडूच्या फुलांच्या माळांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या वन विभागाच्या वाहनातून स्वप्निलची भव्य मिरवणुक काढण्यात आली. ताराराणी चौक ते दसरा चौक यामार्गावरुन ही मिरवणूक झाली. ढोल -ताशांचा गजर, हलगीचा निनाद, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन उभे राहिलेले विद्यार्थी, हेलिकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टी अशा वातावरणात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थी, युवा, अबालवृद्धांसह कोल्हापुरकरांच्या अलोट गर्दीत स्वप्निल कुसाळे याची भव्य आणि जंगी मिरवणुक पार पडली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…