
no images were found
ऑनलाईन पेमेंट सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा – के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ई-गव्हर्नस प्रकल्पद्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत विविध सेवा कोल्हापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहेत. शहरातील नागरिकांना पाणीपट्टी, घरफाळा, परवाना फी भरणा करण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रासह मोबाइल अॅप, संकेतस्थळ, भारत बिल पेमेंट सिस्टिम इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन पेमेंट सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
यापूर्वी विवाह नोंदणी फी, जन्म-मृत्यू नोंदणी दाखला अर्ज करणे, त्याची फी भरणे, माहितीचा अधिकार अंतर्गत माहितीचे शुल्क, कंत्राटदार सुरक्षा अनामत, बयाणा रक्कम तसेच सामान्य पावती अंतर्गत इतर विविध सेवांसाठी फी/शुल्क भरणा करण्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात प्रत्यक्ष जावे लागत होते. यासाठी पर्यायी व्यवस्था नसलेने सुविधा केंद्रातील गर्दीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे महापालिकेच्या विविध सेवांसाठी फी/शुल्क भरणा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे नागरिकांना ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या ऑनलाईन सेवेमध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणी दाखला ऑनलाईन अर्ज करणे, नेटबँक्रि, क्रेडिट/डेबिट कार्ड, इत्यादीसह यूपीआय व क्यू.आर. कोडद्वारे कर/फी भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर/फी भरणा करण्यासाठी नागरिकांना नागरी सुविधा केंद्रात न जाता मोबाइल अँप किंवा संकेतस्थळद्वारे कर/फी भरणा करता येईल. सदर सुविधेमुळे नागरी सुविधा केंद्रात जाऊन कर/फी भरणा करताना नागरिकांना होणारा त्रास कमी होऊन त्यांच्या वेळेची देखील बचत होईल.