no images were found
उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू– अनिल पाटील
मुंबई :- उचंगी व आंबेहोळ लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी व आंबेहोळ लघु पाटबंधारे प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसन प्रश्नांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उप सचिव संजय धारूरकर, जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हे, मुख्य अभियंता तथा सह सचिव अभय पाठक, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), कोल्हापूरच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन, पुनर्वसन विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित गावडे व प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या काही प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असून याबाबत शासनस्तरावर कार्यवाही केली जाईल. जिल्हास्तरावरील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय व दिलासा द्यावा. जलसंपदा विभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वनविभागाच्या हद्दीतून जात असलेल्या रस्त्याचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन सोडवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रकल्पग्रस्तांच्या पर्यायी जमीन मागणीबाबत जिल्हा प्रशासनाने तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करताना अन्य प्रकल्पांमध्ये कोणते निर्णय घेतले आहेत, याची ही तपासणी करून त्याचाही अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या गायरान जमिनीवर आकार नोंद करण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.