no images were found
भारत सरकारचा पोलिओ निर्मुलनाचा निर्धार
कोल्हापूर : भारत सरकारने पोलिओ निर्मुलनाचा निर्धार केला आहे. त्यासाठी बालकांना नियमित लसीकरण व्यतिरिक्त 0 ते 5 वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. यानुसार देश पातळीवर सन 1995/96 पासून गेली 27 वर्षे पल्स पोलिओ कार्यक्रम मोहिम राबविण्यात येत आहे. यंदाच्या या कार्यक्रमातील 28 व्या वर्षी 46,901 बालकांना 3 मार्च 2024 या सत्रात महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मोफत पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. देशात जानेवारी 2011 नंतर अद्याप पर्यंत पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पोलिओ निर्मुलन कार्यक्रमाची सुरवात झालेपासून प्रथमच अशा पध्दतीने यश मिळाले आहे. 27 मार्च 2014 मध्ये भारत देशास पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतू आपले नजिकच्या राष्ट्रामध्ये पोलिओ रुग्ण आढळून येत असलेने जागतीक पोलिओ निर्मुलन होईपर्यंत सदर मोहिम राबविणे आवश्यक आहे. म्हणून शासन मार्गदर्शन सुचनेनुसार महापालिकेने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कृती आराखडा तयार करुन त्यांची अंमलबजावणी सुरु केली आहे. शहरातील ए, बी, सी, डी आणि ई या पाच वार्डस् मध्ये एकूण 173 केंद्रावरुन लसीकरण करण्यात येणार आहे. बी वॉर्ड मध्ये कुटुंब कल्याण केंद्र क्र.1 सावित्रीबाई फुले या प्रमुख केंद्रांतर्गत 32 लसीकरण केंद्रे, ए वॉर्ड मध्ये कुटुंब कल्याण केंद्र क्र.2 फिंरगाई हॉस्पिटल (जुना गुरांचा बाजार) या प्रमुख केंद्रांतर्गत 21 लसीकरण केंद्रे, ई वॉर्डमधील राजारामपूरी कुटुंब कल्याण केंद्रांतर्गत 24 लसीकरण केंद्रे, डी वॉर्डमधील पंचगंगा या प्रमुख केंद्रांतर्गत 25 लसीकरण केंद्रे, काा बावडा येथील कुटुंब कल्याण केद्र क्र.5 या प्रमुख केंद्रांतर्गत 23 लसीकरण केंद्रे, महाडीक माळ येथील कुटुंब कल्याण केंद्र क्र.6 या प्रमुख केंद्रांतर्गत 28 लसीकरण केंद्रे सी वॉर्ड मधील नागरी आरोग्य केंद्र क्र.10 सिध्दार्थ नगर या प्रमुख केंद्रांतर्गत 20 लसीकरण केंद्रे, उघडण्यात येणार आहेत. तसेच सर्व रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅन्डवर बाहेर गावांहून येणा-या बालकांना डोस पाजणेसाठी बुथ स्थापित केली आहेत. शिवाय श्री महालक्ष्मी मंदिर येथे खास बुथ ठेवयात आले आहेत.
यावर्षीच्या मोहिमेच्या सत्रात दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिओ डोसेस पाजण्यात येणार आहेत. यासाठी सर्व प्रमुख सात कुटुंब कल्याण केंद्रावर डोस पोचविणेत येणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 1 प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी, 1 परिचारीका, 1 नोंदणी अधिकारी, 1 मदतनीस शिपाई/आया, 3 स्वयंसेवक इत्यादी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात येणार आहे. शहरातील सर्व केंद्रांवर मिळून एकूण 1200 कर्मचारी वर्ग काम करणार आहे.
या मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी अनेक मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. शहरात ध्वनीक्षेपकावरुन जनजागृती करण्यात येणार आहे. भागाभागातून स्वयंसेवकांमार्फत मोहिमेची माहिती देणे, बॅनर्स, केबल, यावरुन जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचे पालकांना स्मरण होणेसाठी दिनांक 3 मार्च 2024 इ.रोजी सकाळी 8.00, 11.00 व दुपारी 4.00 वाजता छ.राजाराम सहकारी साखर कारखाना व महानगरपालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रांमार्फत सायरन (भोंगा) वाजविण्यात येणार आहे.
काही वर्गामध्ये अजूनही पोलिओ डोसेस पाजण्याबद्दल जागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शहरातील सर्व तरुण मंडळांनी आपल्या मंडळांच्या वार्ताफलकावर मोहिम यशस्वी करण्याबद्दल आवाहन करावे आणि बाळाला नजीकच्या केंद्रावर मोफत लस पाजण्यासाठी पालकांना व्यक्तीश: प्रवृत्त करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी शासन यंत्रणा, सी.पी.आर. हॉस्पीटल, डॉ.डी.वाय.पाटील नर्सिंग इन्स्टिटयुट मेडिकल कॉलेज, जगद्गुरु पंचाचार्य मेडिकल कॉलेज, वेणुताई चव्हाण मेडिकल कॉलेज, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, महालक्ष्मी नर्सिंग कॉलेज, उषाताई नर्सिंग कॉलेज, संजीवा नर्सिंग कॉलेज, रोटरी क्लब, शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये यांचे सहकार्य लाभत आहे.
शासन आदेशाने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त शिल्पा दरेकर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांच्या नियंत्रणाखाली तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समन्वयाने सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पोलिओ या अपंगत्व निर्माण करुन असहाय्य बनविणाऱ्या रोगापासून नव्या पिढीची कायमपणे सुटका करण्याच्या या महत्वाच्या मोहिमेस सहकार्य देणे, सक्रीय सहभाग घेणे हे प्रत्येक घटकांचे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी ठरते. त्यामध्ये सर्वांनी सहकार्य द्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.